शब्दांचे भलतेच अर्थ सांगून तुम्ही जनतेची दिशाभूल कशी काय करु शकता, अशा शब्दांत जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणीस यांना टोला लगावला आहे. ‘फ्री काश्मीर’ पोस्टरवरुन फडणवीसांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निशाणा करीत तुम्ही हे खपवून घेणार का? असा सवाल केला होता. त्यांच्या या सवालाला जयंत पाटील यांनी उत्तर दिले. मात्र, पाटलांच्या प्रत्युत्तराला पुन्हा फडणवीसांनी उत्तर दिल्याने त्यांच्यामध्ये काही काळ ट्विटरवॉर पहायला मिळाले.

जयंत पाटील म्हणाले, “मुंबईत आझाद मैदनात सुरु असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनात ‘फ्री काश्मीर’चे पोस्टर्स झळकवण्यात आले. या पोस्टर्सचा अर्थ काश्मीरला सर्व भेदभावापासून, मोबाईल नेटवर्कच्या बंदीपासून आणि केंद्र सरकारच्या नियंत्रणातून मुक्त करा असा होतो. मात्र, मला विश्वास बसत नाही की, तुमच्यासारखे जबाबदार नेते द्वेषपूर्ण मार्गाने शब्दांचा खेळ करीत लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. हे सत्ता गमावल्यामुळे की स्वतःवरील नियंत्रण गमावल्यामुळे होत आहे?”

जयंत पाटलांच्या या ट्विटला फडणवीस यांनी उत्तर दिले असून ते म्हणाले, “तुमची मला दया येते. फुटीरतावादी वृत्तीला आता सरकारी वकील मिळाला आहे. जयंतराव तुमच्याकडून व्होट बँकेचं राजकारण अपेक्षत नाही. काश्मीरमध्ये कधीच भेदभाव नव्हता. फक्त सुरक्षेसाठी काही काळापासून तिथे निर्बंध आहेत. सरकारमध्ये असू किंवा विरोधीपक्षात राष्ट्र सर्वप्रथम हेच आमचं तत्व राहिलं आहे,” अशा शब्दांत फडणवीसानी जयंत पाटील यांना उत्तर दिले आहे.

दिल्लीच्या जवाहरलाल नेहरु विद्यापीठात (जेएनयू) झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ मुंबईतील आझाद मैदानात काल विद्यार्थ्यांनी आंदोलन केले. यावेळी तिथे ‘फ्री काश्मीर’ची पोस्टर्स झळकावण्यात आली होती. यावर भाजपा आणि काँग्रेससह सिनेसृष्टीतील काही कलाकारांनी आक्षेप घेतला होता. जेएनयूतील हिंसाचाराविरोधातील आंदोलनात काश्मीरचे पोस्टर्स कशासाठी? असा सवालही अनेकांनी उपस्थित केला होता.

काय म्हणाले होते फडणवीस?

देवेंद्र फडणवीस यांनी एएनआयवरील या पोस्टर्सचे ट्विट रिट्विट करीत हे आंदोलन नक्की कोणासाठी आहे? फ्री काश्मीरच्या घोषणांची इथे काय गरज आहे? मुंबईत अशा प्रकारच्या फुटीरतावाद्यांना आपण सहन करु शकता? अशा प्रकारच्या मोहिमा तुम्ही कशा खपवून घेता? असे अनेक प्रश्न मुख्यंमत्री उद्धव ठाकरे यांना विचारले होते.