काळजी करु नका सगळं काही नीट होणार आहे असं आश्वासन अभिनेते नाना पाटेकर यांनी पूरग्रस्तांना दिलं. अभिनेते नाना पाटेकर यांनी आज कोल्हापुरातल्या शिरोळमध्ये भेट दिली. शिरोळमध्ये ५०० घरं बांधणार असल्याचं नाना पाटेकर यांनी स्पष्ट केलं आहे. शासनाने काही निधी दिला आहे. बाकीचे पैसे आम्ही देतो आहे. मला यासाठी कोणतंही श्रेय नको जे काही करतोय ते आपण सगळे करतो आहोत असंही नाना पाटेकर यांनी म्हटलं आहे. पद्माराजे विद्यालयात नाना पाटेकर यांनी काही पूरग्रस्तांची भेट घेतली. काळजी करु नका आपण सगळे सोबत आहोत सगळं काही नीट होणार असं आश्वासन नाना पाटेकर यांनी पूरग्रस्तांना दिलं.

शिरोळमध्ये आलो आहे इथे आता ५०० घरं उभारणार आहोत. नाम, नाना पाटेकर, मकरंद असं आम्हाला श्रेय लाटायचं नाही. प्रत्येकाने आपला वाटा उचलायाचा आहे, आत्ताही अनेकजण मदतीसाठी पुढे येत आहेत. खूप चांगल्या पद्धतीने मदतकार्य सुरु आहे. मी मदत करणार म्हणजे काय? तर मीदेखील झोळी घेऊन लोकांकडेच पैसे मागणार लोक देतात त्यांना विश्वास वाटतो. त्यामुळे खूप चांगल्या पद्धतीने मदतकार्य सुरु करण्यात आलं आहे. जिथे जिथे कमतरता भासेल तिथे आम्ही उभे राहतोच आहोत असेही नाना पाटेकर यांनी म्हटले आहे.

नाना पाटेकर यांनी शिरोळ येथील पद्माराजे विद्यालयाला भेट दिली त्यानंतर ते कोल्हापूर शहर तसेच सांगली या ठिकाणीही जाणार आहेत. तिथलाही आढावा घेऊन कशा प्रकारे मदत करता येईल हे पाहणार आहेत. आज अनेक पूरग्रस्तांना भेटून नाना पाटेकर यांनी त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या आणि त्यांना धीर दिला. काळजी करू नका सगळं काही नीट होईल आपण सगळे मिळून तुमचं दुःख दूर करु असं आश्वासन नाना पाटेकर यांनी दिलं आहे.

दुष्काळ आला होता आणि नाम संस्थेने मागणी केली तेव्हा लोकसंग्रहातून साठ कोटी रुपये दिले. शासनाने सगळं काही केलं पाहिजे असं आपण म्हणतो पण शासन म्हणजे कोण? तर सरतेशेवटी माणसंच ना? आपण सगळ्यांनी मिळून या आपत्तीला तोंड दिलं पाहिजे आपण देतो आहोत त्यामुळे रडायचं नाही असंही नाना पाटेकर यांनी म्हटलं आहे.