भारताच्या संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवनचरित्र अनेक लेखकांनी आपापल्या नजरेतून उलगडले आहे. मात्र, भारतापासून पाकिस्तानची फाळणी होण्यापूर्वी कराचीमध्ये वास्तव्यास राहून वयाच्या तेविसाव्या वर्षी राजापूर तालुक्यातील खरवते गावचे सुपूत्र तानाजी बाळाजी खरावतेकर यांनी ‘डॉ. आंबेडकर’ हे चरित्र लिहीले होते. त्याची दखल ऑब्झव्‍‌र्हर रिसर्च फाऊंडेशन संस्थेने घेतली असून, या पुस्तकाचे तब्बल ७४ वर्षांनी पुनप्र्रकाशन करण्याचा निर्णय घेतला आहे. कै. खरावतेकर यांच्या तालुक्यातील खरवते या मूळ गावी या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात येणार असल्याची माहिती ऑब्झव्‍‌र्हर रिसर्च फाऊंडेशन संस्थेचे प्रकल्प समन्वयक दयानंद जाधव यांनी दिली.

भारतापासून पाकिस्तानची फाळणी होण्यापूर्वी या काळामध्ये प्रसिद्ध असलेल्या कराची बंदराच्या शहरामध्ये व्यापार-उदीमासह उदरनिर्वासाठी कोकणातील अनेक कुटुंबे कराचीमध्ये वास्तव्याला होते. त्यापैकी खरावतेकर यांचे एक कुटुंब होते. मुंबई विद्यापीठाचे कोकणातील इतिहास विषय घेऊन कला शाखेचे डॉ. आंबेडकरानंतरचे पहिले पदवीधर असलेले खरावतेकर यांनी अभ्यासपूर्ण लेखन केलेले ‘डॉ. आंबेडकर’ हे पुस्तक त्यावेळी कराची येथून प्रसिद्ध झाले होते. या पुस्तकाने बाबासाहेबांचा संपूर्ण जीवनपट उलगडला आहे. त्या पुस्तकाची प्रत सध्या दुर्मिळ झाली असून, त्याचे मुंबई-कराची फ्रेंडशिप फोरम या व्यासपीठाअंतर्गत ऑब्झव्‍‌र्हर रिसर्च फाऊंडेशनने पुर्नमुद्रण केले आहे. बाबासाहेबांचे १२५ व्या जयंती वर्षांचे औचित्य साधून त्याचे प्रकाशन मुंबई येथे ज्येष्ठ विचारवंत डॉ. रावसाहेब कसबे यांच्या हस्ते नुकतेच झाले. त्याच पुस्तकाचे खरावतेकर यांच्या तालुक्यातीस खरवते या मूळ गावी प्रकाशन करण्याचा मानस असल्याची माहिती जाधव यांनी दिली. यासंबंधित खरवतेचे सरपंच चंद्रशेखर कुळकर्णी यांच्याशी सकारात्मक चर्चाही झाल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. यावेळी खरवतेचे पोलीस पाटील जयप्रकाश खरवतेकर, ज्येष्ठ ग्रामस्थ काशिनाथ खरवतेकर, पाणलोट समितीचे अध्यक्ष तुकाराम भिकणे, शिक्षक खरवतेकर आदी उपस्थित होते.