राज्यभर ठिकठिकाणी नाटय़प्रयोग सुरू, प्रेक्षकांचा उत्साही प्रतिसाद

निलेश अडसूळ, लोकसत्ता

मुंबई : नाटकाला सशर्त परवानगी मिळाली असली तरी आर्थिक अडचणींमुळे अद्याप व्यावसायिक नाटकाचा पडदा उघडलेला नाही. परंतु प्रायोगिक रंगभूमीने आघाडी घेत राज्यभरात ठिकठिकाणी नाटय़प्रयोग सुरू केले आहेत. विशेष म्हणजे आतुरतेने वाट बघणारे प्रेक्षकही प्रायोगिक नाटय़प्रयोगांना उत्तम प्रतिसाद देत आहेत.

मनोरंजन क्षेत्रावरील संकट अद्याप कायम आहे. नाटक आणि अन्य ललित कलांना आर्थिक संकटातून सावरण्यासाठी आणखी काही वेळ लागू शकतो. परंतु, प्रायोगिक रंगभूमीवर मात्र सकारात्मक वातावरण आहे. नवनवीन विषय, रंगमंचाच्या अभिनव कल्पना आणि प्रेक्षकांचा विश्वास यावर काही हौशी नाटकवेडय़ांनी तालमी आणि प्रयोग सुरू केले आहेत.

नाशिकमधील प्रथमेश जाधव या तरुणाने नाटय़गृहाचे टाळे उघडण्याची वाट न पाहता आपल्या गच्चीलाच नाटय़गृह बनवले आहे. मुंबईमध्ये येऊन अभिनय क्षेत्रात पाय रोवू पाहणाऱ्या प्रथमेशने टाळेबंदीनंतर आपले गाव गाठले. परंतु नाटक करण्याची उमेद स्वस्थ बसू देत नसल्याने त्याने स्वत:च्या गच्चीवरच अडगळीतल्या वस्तूंचा उपयोग करून नेपथ्य-रंगमंच उभारला. या खुल्या रंगमंचावर नाशिकमधलेच नाही तर राज्यभरातील प्रायोगिक कलावंत नाटय़प्रयोग करत आहेत.

करोना टाळेबंदीनंतरच्या आपल्या अनोख्या प्रयोगाविषयी प्रथमेश म्हणाला, ‘‘१२०० चौरस फुटांच्या गच्चीवर मी नाटकाच्या अभिवाचनाचे प्रयोग सुरू केले तेव्हा मिळालेल्या प्रतिसादावरून रसिकांची नाटकाविषयीची तळमळ दिसली. नंतर नाशिकच्या कलावंतांनी या गच्चीवरच्या रंगमंचावर नाटक सादर केले. मग मुंबई विद्यापीठ आणि मराठवाडा विद्यापीठातील संस्थांनी येऊन प्रयोग केले.’’

पुण्यात सुदर्शन रंगमंच आणि ज्योत्स्ना भोळे सभागृहाने मोफत रंगमंच उपलब्ध करून रंगकर्मीची हौस पुरवली आहे. रंगकर्मी अतुल पेठे यांच्या ‘शब्दांची रोजनिशी’ या नाटकाचे प्रयोग सुदर्शन रंगमंचावर गेले तीन दिवस उत्तम प्रतिसादात सुरू आहेत, तर रंगकर्मी प्रदीप वैद्य यांच्याही ‘द बॉक्स थिएटर’मध्ये सादर केलेल्या ‘सावल्या’च्या पहिल्याच प्रयोगाला पुणेकरांनी भरभरून प्रतिसाद दिला. विशेष म्हणजे केवळ समाजमाध्यमांवर केलेल्या जाहिराती पाहून प्रेक्षक आले. केवळ आले नाही तर सुजाणतेने सुरक्षिततेचे नियम पाळून कलाकारांना सहकार्य केले. ‘‘या धाडसात तोडा आर्थिक तोटा सहन करावा लागला, पण नाटक पुन्हा सुरू होण्यासारखे समाधान नाही. आमच्यामुळे इतर कलाकार आणि प्रेक्षकांना प्रोत्साहन मिळाले तर आनंद होईल’ असे अतुल पेठे यांनी सांगितले.

जळगाव येथील परिवर्तन ही नाटय़ संस्थाही स्थानिक पातळीवर ‘नली’ या नाटकाचा प्रयोग करीत आहेत. ‘अभिनय कल्याण’ ही नाटय़ संस्थाही लवकरच ‘गावनवरी’ आणि ‘साबण’ या नाटकांचे प्रयोग करणार आहे.

मुंबईतले नाटय़प्रयोग

– मुंबईत रंगकर्मी मकरंद देशपांडे यांनी डिसेंबरच्या पहिल्या आठवडय़ात एपिक गडबड, गांधी, पिताजी प्लीज या नाटकांचे प्रयोग जुहूच्या पृथ्वी थिएटरमध्ये ठेवले आहेत.

– चित्रकार अमृता शेरगिल यांच्या पत्रांवर आधारित मराठी दोन अंकी नाटक ‘तुझी आम्री’चे प्रयोग अमृता यांच्या स्मृतिदिनानिमित्त ५ डिसेंबरला दुपारी ४.३० वाजता मुलुंडच्या कालिदास नाटय़गृहात, तर दुसरा प्रयोग ६ डिसेंबरला दुपारी ४.३० वाजता बोरिवलीच्या प्रबोधनकार ठाकरे लघुनाटय़गृहात होईल.

– टाळेबंदीत नाटकाचे ऑनलाइन अभिवाचन करून तालमी करण्यात आल्या. अभिनेत्री रसिका वाखारकर आणि शर्वरी लहाडे या दोघी प्रमुख भूमिकेत आहेत, सुरक्षिततेचे नियम पाळून प्रयोग होईल, असे दिग्दर्शक शेखर नाईक यांनी सांगितले.

सुरुवातीला भ्रमणध्वनींच्या आधारे तालमी केल्या, मग प्रत्यक्ष. नऊ महिन्यांनी रंगमंचावर पाऊल ठेवताना अनेक प्रश्न आणि भीती होती. परंतु प्रेक्षकांच्या प्रेमामुळे आत्मविश्वास दुणावला.

– अतुल पेठे, ज्येष्ठ नाटककार-दिग्दर्शक

माझ्या गच्चीवरच्या रंगमंचावर एकावेळी ४० प्रेक्षक सुरक्षिततेचे नियम पाळून प्रयोग पाहू शकतात. विशेष म्हणजे पुरुषोत्तम बेर्डे, अतुल पेठे अशा दिग्गजांनीही या रंगमंचावर प्रयोग केले.

– प्रथमेश जाधव, प्रायोगिक रंगकर्मी, नाशिक