सूर्याच्या ध्रुव बदलामुळे यावर्षी भारतासह संपूर्ण जगभर अत्यंत कडाक्याची थंडी, तीव्र उष्णता, अतिवृष्टी आणि महापुराचे प्रमाण वाढले आहे. यामुळे सौरमालेत वादळी स्थिती निर्माण झाली असून, त्याचा आंशिक परिणाम पृथ्वीवर झाला आहे. नासाच्या वैज्ञानिकांनी केलेल्या अभ्यासात याचा उलगडा झाल्याची माहिती सेन्ट्रल इंडिया स्कॉय वॉच ग्रुपचे अध्यक्ष सुरेश चोपणे यांनी ‘लोकसत्ता’ला दिली.
सूर्याच्या ध्रुवात बदलाची घटना दर ११ वर्षांनी घडते. सौर डाग, सौर विस्फोट आणि सौर वातांच्या घडामोडीत वाढ होते. यानंतर सूर्याच्या ध्रुवांची अदलाबदल होते आणि काही काळ सूर्य गुरुत्व शून्य होतो. यामुळे सौरमालेत वादळी स्थिती निर्माण होऊन त्याचा आंशिक परिणाम पृथ्वीवर होतो. ही ध्रुवबदलाची घटना अगदी ९० दिवसांवर येऊन ठेपली असल्याची नोंद नासाने केली आहे. सूर्याच्या ध्रुवबदलाची घटना दर ११ वर्षांनी घडते याला सौरचक्र असे म्हणतात. या सौरचक्राचा कालावधी १ ते २ वर्षांचा असतो. या दरम्यान सूर्यावर डागांचे प्रमाण वाढते, सौर विस्फोटांचे प्रमाण वाढून सूर्यमालेत सौरद्रव्य बाहेर फेकले जाते. सूर्याच्या अंतरंगात प्रचंड हालचाली घडून येतात. सूर्याचे गुरुत्व काही काळ शून्य होते. याचा प्रभावी पृथ्वीसहित सूर्यमालेत जाणवतो. सध्याचे सौरचक्र हे २०११ ते २०१३ या काळादरम्यान झाले असून, सूर्यावर प्रचंड विस्फोट झाले आहेत. म्हणूनच भारतासह संपूर्ण जगभर अत्यंत थंडी, उष्णता व महापुराचे प्रमाण वाढल्याचे दिसून येते. गेल्या वर्षीपासून पृथ्वीवरील हवामानात झालेला बदल हा सौरचक्राचाच भाग असल्याचे मत चोपणे यांनी व्यक्त केले. सूर्यावरील ध्रुवांची अदलाबदली ही घटना येत्या नोव्हेंबर महिन्यात घडण्याची शक्यता नासाचे वैज्ञानिक व विलकॉक्स सोलार ऑब्झरवेटरीचे संचालक टोड होकसेमा यांनी व्यक्त केली आहे. सध्या सूर्याच्या दक्षिण ध्रुव आणि उत्तर ध्रुवाची जागा बदलत असून काही दिवसांत उत्तर ध्रुव दक्षिण ध्रुवाची जागा घेईल. यादरम्यान सूर्याचे गुरुत्व काही काळ शून्य राहणार असून ध्रुव बदलल्यानंतर ते पूर्ववत प्राप्त होईल. शून्य गुरुत्वादरम्यान सूर्याचे गुरुत्व कवच न राहिल्याने अवकाशातील घातक किरणांचा मारा पृथ्वीवर होण्याची शक्यता आहे. अवकाशातील उपग्रह अवकाशयात्री यांनाही धोका पोहचू शकतो. सूर्यावरील मोठय़ा विस्फोटामुळे टी. व्ही., मोबाइल व संचार यंत्रणेत बिघाडाची शक्यता असते. सूर्याच्या विद्युतभारित कणांमुळे व गुरुत्व क्षेत्रात घट झाल्यामुळे सूर्यमालेतच वादळी स्थिती निर्माण होते. मात्र नासाचे वैज्ञानिक व सौर ध्रुवबदलाचे अभ्यासक फिर शेरर यांनी या सौरचक्राचा पृथ्वीवर व मानवावर काहीही परिणाम होणार नाही असे सांगितले आहे. वैज्ञानिकांनी गेल्या तीन सौर चक्रांचा अभ्यास केला आहे, परंतु तुरळक घटनांशिवाय विशेष प्रभाव पृथ्वीवर जाणवला नव्हता, परंतु २००० ते २०१२ साली जगबुडी होणार असल्याच्या अफवांचा संबंध या सौरचक्राशी होता, असे लक्षात येते.
फेडरल रिझव्र्ह बँकेने प्रसिद्ध केलेल्या अहवालात सौरचक्राचा परिणाम व्यापारावर व स्टॉक मार्केटवर होणार असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे तिथे भीती निर्माण झाली आहे. यापूर्वी अनेक ठिकाणी विद्युत यंत्रणेत बिघाड झाल्याचे व उपग्रहात बिघाड झाल्याच्या घटना घडल्या आहेत. मात्र पृथ्वीच्या व ग्रहाच्या कक्षेवर किंवा मानवावर परिणाम झाल्याचा पूर्वेइतिहास नाही. त्यामुळे या घटनेमुळे लोकांनी घाबरण्याचे काहीही कारण नसल्याचा दावा सुरेश चोपणे यांनी केला आहे.
संग्रहित लेख, दिनांक 2nd Sep 2013 रोजी प्रकाशित
सौरमंडळात अनोख्या बदलांचे संकेत
सूर्याच्या ध्रुव बदलामुळे यावर्षी भारतासह संपूर्ण जगभर अत्यंत कडाक्याची थंडी, तीव्र उष्णता, अतिवृष्टी आणि महापुराचे प्रमाण वाढले आहे.
First published on: 02-09-2013 at 04:12 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Drastic changes in universe