करोनामुळे शाळा बंद पडल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी ‘शाळा बंद, शिक्षण सुरू’ या ब्रीदवाक्यानुसार गावागावांमध्ये जिल्हा परिषदेचे  मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले यांच्या संकल्पनेतून ‘मिशन मॅथमॅटिक्स’ हा उपक्रम  राबवण्यात येत आहे. राज्यातील हा पहिलाच उपक्रम आहे.

जिल्हय़ातील विद्यार्थ्यांना चालता-बोलता, खेळताना आनंददायी शिक्षणाचे धडे मिळावेत, या उद्देशातून या संकल्पनेला सुरुवात झाली. गावागावांमध्ये मुख्य चौरस्त्याच्या भिंतीवर चित्रांमधून ‘मिशन मॅथमॅटिक्स’च्या संकल्पना रेखाटण्यात आल्या आहेत. शिक्षणाविषयी विद्यार्थ्यांमध्ये गोडी निर्माण झाली आहे. विद्यार्थी खेळताना मित्राच्या व पालकांच्या सहकार्याने शिक्षणाचे धडे गिरवू लागले आहेत. सर्वप्रथम पोंभुर्णा तालुक्यातील घोसरी येथील अक्षय वाकुडकर या अभियंत्याने गावात ‘मिशन मॅथमॅटिक्स’ उपक्रमाला सुरुवात केली. या उपक्रमाचा गावातील विद्यार्थ्यांना फायदा होऊ लागल्याने त्याची दखल घेत मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले यांनी संपूर्ण जिल्हय़ात हा उपक्रम राबवण्याचा निर्णय घेतला.

आतापर्यंत पोंभुर्णा, बल्लारपूर, नागभीड, ब्रह्मपुरी तालुक्यातील गावांमध्ये या उपक्रमाची अंमलबजावणी करण्यात आली आहे. उपक्रमात गणितीय, भूमितीय, विज्ञान संकल्पना इत्यादींचा समावेश आहे. त्याचा ज्या गावात ऑनलाइन शिक्षण शक्य नाही तेथील विद्यार्थ्यांना मोठा फायदा झाला आहे. भिंतीवर रेखाटलेल्या गणितांमुळे विद्यार्थ्यांमध्ये त्याची गोडी निर्माण होत आहे. याद्वारे मुलांची निरीक्षण क्षमता वाढवणे शक्य होत असल्याची माहिती राहुल कर्डिले यांनी दिली.