पंढरपुरात येणाऱ्या भाविकांची संख्या उत्तरोत्तर वाढत चालली असताना त्यांना देण्यात येणाऱ्या सुविधाही त्याप्रमाणात वाढल्या पाहिजेत. पंढरपूरचे प्रश्न व विविध अडचणी सोडविण्यासाठी पंढरपूर येथे राज्य मंत्रिमंडळाची विशेष बैठक घेण्यासाठी आपण आग्रह धरणार असल्याचे महसूल व कृषिमंत्री एकनाथ खडसे यांनी सांगितले. बा विठ्ठला, देशात महाराष्ट्र प्रथम क्रमांकाचे राज्य बनू दे, विकासाच्या बाबतीत हे राज्य नेहमीच अग्रेसर राहू दे, अशी प्रार्थना आपण केल्याचे त्यांनी नमूद केले.
कार्तिकी एकादशीनिमित्त पंढरपुरात विठ्ठलाची शासकीय महापूजा खडसे यांनी पहाटे सपत्नीक केली. पूजेनंतर आयोजित सत्कार सोहळ्यात ते बोलत होते. या प्रसंगी त्यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांच्यासह विठ्ठल मंदिर समितीचे अध्यक्ष अण्णा डांगे, आमदार सुरेश खाडे, आमदार राणा जगजितसिंह पाटील, शिक्षक आमदार दत्तात्रेय सावंत, तसेच विभागीय आयुक्त विकास देशमुख, जिल्हाधिकारी डॉ. प्रवीण गेडाम, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश काकाणी, सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक दत्तात्रेय मंडलिक आदी उपस्थित होते.
खडसे म्हणाले, की पंढरपूर येथील चंद्रभागा नदी प्रदूषणमुक्त करण्यासाठी शासनामार्फत कार्यक्रम हाती घेतला जाणार असून चंद्रभागेत बारा महिने पाणी राहिले पाहिजे. पंढरपुरात भुयारी गटारी योजना व अन्य विकास कामांसाठी केंद्र सरकारकडे विशेष निधी मिळण्यासाठी आग्रह धरणार असल्याचे त्यांनी नमूद केले. या प्रसंगी त्यांनी महाराष्ट्र राज्य संपूर्ण देशात क्रमांक एकचे राज्य बनावे आणि विकासातही हे राज्य अव्वल दर्जाचे ठरावे, अशा शब्दात विठ्ठलाकडे साकडे घातले.
या वेळी माजी मंत्री बबनराव पाचपुते, माजी खासदार शिवाजी कांबळे, माजी आमदार उल्हास पवार, प्रांताधिकारी संजय तेली, तसेच मंदिर समितीचे सदस्य वसंत पाटील, प्रा. जयंत भंडारे आदी उपस्थित होते. या प्रसंगी नांदेड जिल्ह्य़ातील तरोडा बुद्रूक येथील वारकरी सुरेश कुलकर्णी (४७) व त्यांच्या पत्नी वंदना कुलकर्णी (४२) यांना कार्तिकी यात्रेतील मानाचे वारकरी प्रतिनिधी म्हणून शासकीय महापूजेत सहभागी होण्याचा मान मिळाला. त्याबद्दल मंदिर समितीच्यावतीने कुलकर्णी दाम्पत्याला वर्षभर मोफत एसटी प्रवासाची सवलत देण्यात आली. मोफत एसटी प्रवास पास खडसे यांच्या हस्ते कुलकर्णी दाम्पत्याला प्रदान करण्यात आला.