ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी आज राष्ट्रवादी प्रवेश करत असल्याची अधिकृत माहिती दिली. माध्यमांशी बोलताना त्यांनी भाजपा सोडण्यामागील कारणांचा खुलासा केला. त्याचबरोबर माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोपही केले. याच आरोपांचा हवाला देत राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे.

राज्यातील विधानसभा निवडणुकांपासून वाढत गेलेल्या नाराजीनंतर एकनाथ खडसे यांनी अखेर पक्षाचा राजीनामा दिला. माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करत खडसे यांनी पक्षाचा राजीनामा दिला. त्यानंतर जयंत पाटील यांनी खडसेंच्या प्रवेशाबद्दल माहिती दिली. त्यानंतर एकनाथ खडसे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याकडून त्रास झाल्याचा गंभीर आरोप केला. त्याचबरोबर इतरही मुद्दे त्यांनी मांडले.

एकनाथ खडसे यांच्या आरोपांचा हवाला देत आमदार अमोल मिटकरी यांनी ट्विट करत फडणवीस यांना लक्ष्य केलं. “देवेंद्र फडणवीस यांचं राजकारण इतकं खुनशी असेल, याची यापूर्वी कधी कल्पना केली नव्हती. आज एकनाथजी खडसे साहेबांनी अंतःकरण पुर्वक जे मुद्दे पत्रकार परिषदेत मांडले ते ऐकून धक्का बसला. चार दशकं ज्यांनी पक्ष वाढवला त्या नेत्यांना असा त्रास? केंद्राने गंभीर दखल घ्यावी,” अशी मागणी त्यांनी फडणवीसांवर टीका करताना केली आहे.

कधी करणार राष्ट्रवादी प्रवेश?

“भाजपाची खऱ्या अर्थानं वाढ करणारे एकनाथ खडसे यांनी त्यांचा पक्ष सोडल्याचं मला सांगितलं. त्यामुळे त्यांनी भाजपाचा त्याग केला आहे. खडसे शुक्रवारी दुपारी दोन वाजता राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. त्यांना काय पद देण्यात येईल वगैरे आता काही सांगता येणार नाही. त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश होतोय हीच आनंदाची बाब आहे. भाजपात त्यांच्यावर झालेल्या अन्यायामुळे त्यांनी भाजपा सोडला असून, त्यामुळेच त्यांना राष्ट्रवादीत प्रवेश देण्यात येत आहे,” असं पाटील यांनी सांगितलं.