गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात केंद्रस्थानी असलेल्या ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या प्रवेशाच्या चर्चेवर अखेर शिक्कामोर्तब झालं आहे. एकनाथ खडसे यांनी भाजपा सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर ते राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची घोषणा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली. त्यानंतर एकनाथ खडसे यांनी पुन्हा एकदा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला. राष्ट्रवादी प्रवेश करणार असल्याचं निश्चित झाल्यानंतर खडसे यांनी पत्रकार परिषदेत सल बोलून दाखवली.

राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची माहिती जयंत पाटील यांनी दिल्यानंतर एकनाथ खडसे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना खडसे म्हणाले,”गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजन, पांडुरंग फुंडकरांसारखे कितीतरी नेते होते. त्यांच्यासोबत आजतागातयत भाजपाचं काम केलं. भाजपाने मला अनेक मोठी पदं दिली, मी ती नाकारु शकत नाही. मी भाजपावर किंवा केंद्रातील नेत्यावर टीका केली नाही. माझ्यासोबत एकही आमदार, एकही खासदार नाही. रक्षा खडसे भाजपा सोडणार नाही, असं त्यांनी सांगितलं आहे, त्यांचा निर्णय घेण्यासाठी त्या सक्षम आहेत”, असं खडसे म्हणाले.

आणखी वाचा- खडसेंना पश्चाताप होईल, राष्ट्रवादीत त्यांना किंमत मिळणार नाही – राम शिंदे

“भाजप सोडताना खंत आहे. मला पक्षातून ढकलून लावलं. महिलेला माझ्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करायला सांगितला, फडणवीसांनी मनस्ताप दिला. बहुजन समाजाचा मुख्यमंत्री असला पाहिजे, या माझ्या वक्तव्यानंतर जे घडलं ते महाराष्ट्राला माहिती आहे. एसीबी चौकशी, भूखंड प्रकरण, दमानिया यांनी विनयभंगाचा खोटा खटलाही दाखल केला. पोलिसांच्या नकारानंतरही देवेंद्रजींनी सांगितल्याने खटला नोंदवला गेला,” अशी टीका एकनाथ खडसेंनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली.

आणखी वाचा- ग्राम पंचायत निवडणूक, सरपंच ते महसूल मंत्री एकनाथ खडसेंचा राजकीय प्रवास

“मला राष्ट्रवादीने कोणतंही आश्वासन दिलं नाही. मंत्रिपदाबाबत राष्ट्रवादीच सांगू शकेल. मला पदाची अपेक्षा नाही. माझ्या ताकदीने मी पदं मिळवली आहेत. सहकारातून मिळवलं आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होईपर्यंत माझ्यावर झालेला एक आरोप सांगा, नाईलाजाने मला भाजपाचा त्याग करावा लागत आहे,” असंही खडसे म्हणाले.