02 March 2021

News Flash

जळगाव भाजपमध्ये खडसे-महाजन उभी फूट!

सत्तासंघर्ष दिवसेंदिवस तीव्र होऊ लागला

गिरीश महाजन

माजी महसूलमंत्री आमदार एकनाथ खडसे आणि जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्यातील सत्तासंघर्ष दिवसेंदिवस तीव्र होऊ लागला असून काही दिवसांपासून त्यांच्यातील बंद दाराआड होणारे वादविवाद चव्हाटय़ावर येऊ लागले आहेत. मागील महिन्यात पक्षाच्या जिल्हा बैठकीत दोघांचे समर्थक प्रथमच एकमेकांना जाहीरपणे भिडल्यानंतर आता जिल्हा परिषद सभापती निवडणुकीदरम्यान या दोन्ही बडय़ा नेत्यांमधील वाद टोकाला गेले आहेत. या वादामुळे जिल्हा परिषद व बहुतांश पंचायत समित्यांमध्ये खडसे व महाजन असे दोन गट पडले आहेत. गटातटाच्या राजकारणामुळेच जिल्ह्य़ात काँग्रेस आणि राष्ट्रवादी तळाला गेल्याचा इतिहास असताना या दोन नेत्यांमधील वाद भाजपला कुठे घेऊन जाणार, असा प्रश्न कार्यकर्त्यांमध्ये उपस्थित होत आहे.भ्रष्टाचाराच्या विविध आरोपांमुळे अडचणीत आल्यानंतर भाजपने खडसेंना मंत्रिपदावरून दूर केल्यापासून जिल्ह्य़ातील खडसे गट दुखावला गेला. दुसरीकडे राज्य पातळीवरून महाजन यांना अतिरिक्त बळ देण्यास सुरुवात झाली. जिल्ह्य़ातील नगरपालिका, विधान परिषद, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांदरम्यान उमेदवारनिश्चितीपासून अनेक महत्त्वपूर्ण निर्णयांवर महाजन यांचाच वरचष्मा राहिला. त्यानंतर खडसे यांच्या नाराजीत वाढच होत गेली. निवडणुकीदरम्यान भाजपच्या बैठकीत खडसे व महाजन गटाचे कार्यकर्ते उघडपणे एकमेकांना भिडल्याने दोन्ही नेत्यांमधील अंतर्गत वादावर प्रथमच जाहीररीत्या शिक्कामोर्तब झाले. जिल्हा परिषद अध्यक्ष-निवडीदरम्यानदेखील दोघांचे संबंध ताणले गेले होते.यानंतर सभापती निवडीदरम्यान तर दोघांमधील वादाने वेगळेच स्वरूप धारण केले. जिल्ह्य़ाची वेस ओलांडून वादाने थेट राज्य पातळी गाठली. खडसे यांनी आर. जी. पाटील यांच्या पत्नी अरुणा पाटील यांच्या नावाला हिरवा झेंडा दाखविल्यानंतर महाजन यांनी दिलीप पाटील यांचे नाव पुढे केले. महाजनांसमोर कोणत्या ना कोणत्या कारणामुळे सातत्याने माघार घ्यावी लागत असल्याने धुमसणारे खडसे या प्रकाराने चांगलेच संतप्त झाले. प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क करीत त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. दुसरीकडे महाजन यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संवाद साधत झाल्या प्रकाराची माहिती दिली. खडसेंनी थेट आमदारकीचा राजीनामा देण्याची धमकी दिल्यानंतरही नाटय़पूर्ण घडामोडीनंतर पुन्हा एकदा त्यांनाच दोन पाऊल मागे घ्यावे लागले. अरुणा पाटील यांचा अर्ज मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला.  संतप्त खडसे बैठक सोडून विश्रामगृहातून निघून गेले.

विजयी उमेदवारांच्या सत्कारासाठी त्यांनी भाजप कार्यालयात जाणेही टाळले. यामुळे जिल्हा परिषदेत खडसे समर्थक व महाजन समर्थक असे दोन गट पडले आहेत. जिल्हा परिषदेतील पुढील कामकाजात सत्ताधारी व विरोधक या दोन्ही भूमिकांमध्ये त्यामुळे भाजप दिसण्याची शक्यता आहे.खडसे यांच्या मंत्रिपदाच्या कार्यकाळात अनेक प्रकल्पांची घोषणा करण्यात आली होती. त्यांचे मंत्रिपद जाताच या प्रकल्पांची चर्चाही बंद झाली. यात प्रामुख्याने यावल तालुक्यातील हिंगोणा येथे दोन कोटी रोपांची क्षमता असलेला टिश्यू प्रकल्प मंजूर करण्यात आला होता. राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून या प्रकल्पाला ६० एकर जमीन केंद्र सरकारमार्फत देण्यात आली. मात्र तो प्रकल्प रद्द झाला. वरणगाव येथील पोलीस प्रशिक्षण केंद्राला तब्बल १६ वर्षांनंतर १०६ एकर जागा मंजूर करण्यात आली होती. तेही रद्द करण्यात आले. रावेर तालुक्यातील पाल येथील पशू महाविद्यालयाला १०० एकर व भुसावळ कुक्कुट संशोधन केंद्रासाठी पाच एकर जागा देण्यात आली. हे प्रकल्पही रद्द झाले. मुक्ताईनगरात सालबर्डी येथे ११० एकरांवर कृषी अवजार संशोधन केंद्र मंजूर करून नंतर रद्द करण्यात आले. मुक्ताईनगरला कृषी विद्यापीठ सुरू करण्याच्या हालचाली सुरु असताना आता या विद्यापीठासाठी धुळे जिल्ह्य़ातूनही जोर लावण्यात येत आहे. मोहाडी शिवारात १०० खाटा असलेले रुग्णालय तसेच पशुवैद्यकीय महाविद्यालय करण्याची घोषणा झाल्यानंतरही पुढे हालचाली झालेल्या नाहीत. याव्यतिरिक्त तूर संशोधन केंद्रासाठी ९० एकर जागा मिळूनही विषय थंड बस्त्यात आहे. खडसे-महाजन यांच्यातील अंतर्गत वाद या सर्वाना कारणीभूत असल्याचे मानले जात आहे. दोघांमध्ये वाद असला तरी त्याचा जिल्ह्य़ाच्या विकासकामांवर परिणाम होऊ नये, अशी कार्यकर्त्यांची अपेक्षा आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 6, 2017 2:12 am

Web Title: eknath khadse vs girish mahajan in jalgaon 2
Next Stories
1 ८ भ्रूण १६ आठवडय़ांपेक्षा अधिक दिवसांचे
2 तूर खरेदीची कोंडी कायम, देयकेही मिळेनात
3 ‘ती’आत्महत्या शेतीच्या कर्जामुळे नव्हे’
Just Now!
X