विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती होण्यासाठी ‘ईव्हीएम’वर शालेश मंत्रिमंडळाची निवडणूक घेण्यात आली. अकोला पंचायत समिती अंतर्गत जि.प. शाळा पाचमोरी येथे हा उपक्रम राबवण्यात आला.

पाचमोरी शालेय निवडणुकीत मुख्याध्यापिका मनीषा शेजोळे यांनी ‘इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन’ अ‍ॅपचा वापर करून टॅबच्या सहाय्याने मतदान घेतले. विद्यार्थ्यांमध्ये निवडणूक प्रक्रियेची जनजागृती होण्यासाठी जि.प. शाळेत विशेष उपक्रम घेण्यात आला. एकूण सहा पदासाठी ही निवडणूक प्रक्रिया पार पडली. अ‍ॅपमध्ये नामनिर्देशन अर्ज भरून घेण्यात आले. निवडणूक प्रक्रियेत एकूण सहा जागांसाठी आठ विद्यार्थी रिंगणात होते. प्रत्येक मतदार सहा जागांसाठी बटन दाबून मतदान करत होता.

मतदान केलेल्या विद्यार्थ्यांच्या बोटाला शाई लावण्यात आली. १०० टक्के मतदान झाल्यावर मतदान अधिकारी मनीषा शेजोळे यांनी निकालासाठी बटन दाबून ‘स्क्रीन’वर दिसणारा निकाल जाहीर केला. प्रत्येक उमेदवाराच्या नावासह अहवाल तयार केला.

शालेय मंत्रिमंडळात निवडून आलेले विद्यार्थी मुख्यमंत्री रेहान फारुख शेख, शिक्षणमंत्री आयुष धांडे, आरोग्यमंत्री अनुष्का इंगळे, स्वच्छतामंत्री अनिता परघरमोर, वनसंवर्धन मंत्री समीक्षा जाधव, क्रीडामंत्री आदेश खंडारे यांचा सत्कार करण्यात आला. शालेय निवडणुकीत ‘ईव्हीएम’चा वापर करून विद्यार्थ्यांमध्ये कृतीतून जनजागृती करण्यात आली.