दिगंबर शिंदे

निवडणुकीचा पारा चढू लागला; भाजपचे दिग्गज नेते मैदानात

सांगलीचा पारा १३ अंशापर्यंत घसरला असतानाच राजकीय वातावरण मात्र दिवसेंदिवस तापत चालले आहे. लोकसभा निवडणुका चार महिन्यांवर आल्याने निवडणूक ज्वर हळूहळू चढू लागला आहे. भाजप मोठे नेते जिल्ह्य़ाच्या मैदानात उतरवत आहे. कवठेमहांकाळ तालुक्यातील नागज येथे विकास कामांच्या उद्घाटनाच्या निमित्ताने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लोकसभा निवडणुकीचे रणिशग फुंकण्यासाठी रविवारी येत आहेत. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार तासगावमध्ये येत असून त्यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीची पुनर्बाधणी करण्यासाठी बठक होणार आहे. तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हेसुद्धा जानेवारीच्या पहिल्या आठवडय़ात सांगलीत येत आहेत.

दुसऱ्या बाजूला जनसंघर्ष यात्रेच्या निमित्ताने एकत्र आलेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अद्याप सांगलीत फिरकलेले नाहीत. लोकसभेसाठी दोन्ही काँग्रेसची आघाडी होणार हे आता जवळजवळ निश्चित मानले जात आहे. गेल्या निवडणुकीत सांगलीची जागा काँग्रेसच्या वाटय़ाला गेली होती. तोच जागावाटपाचा निकष कायम राहिला तर ही जागा काँग्रेसला लढवावी लागणार आहे. भाजप- शिवसेना युती आणि दोन्ही काँग्रेसची आघाडी अशी सरळ लढत होणार असे आज गृहीत धरले जात आहे. या दृष्टीनेच राजकीय आडाखे बांधले जात आहेत. भाजपने लोकसभेची तयारी एक वर्षांपासून सुरू केली आहे, तर काँग्रेस मात्र सुस्तावलेल्या अजगराप्रमाणे शांतच आहे. परंतु जागे झाल्यानंतर त्याला पुन्हा मित्रपक्षाचे रुसवे-फुगवे काढावे लागणार आहेत.

महापालिका निवडणुकीत कृष्णाकाठी कमळ कसे फुलले याचे आश्चर्य सर्वानाच वाटले असले तरी यामागे पक्षांतर्गत मतभेद आणि याचा नेमका भाजपने घेतलेला फायदा हेच कारण आहे. २०१४च्या सार्वत्रिक निवडणुकीवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लाट होती. अच्छे दिनची हवा होती, ‘अबकी बार मोदी सरकार’ घोषणा लोकांना आकर्षित करीत होती. भाजप कुणाच्या पासंगलाही नव्हता. मात्र  गेल्या चार-साडेचार वर्षांत भाजपने आयात नेतृत्वाला आपलेसे करीत काही नगरपालिका, पंचायत समित्या आणि त्यापाठोपाठ जिल्हा परिषदेची सत्ताही हस्तगत केली. जिल्ह्य़ात आपले बसवले नाही तर मजबूत केले. या जोरावर पुन्हा एकदा तो लोकसभा निवडणुकीला सामोरा जाणार आहे. महापालिका जिंकल्याने भाजपनेत्यांचा विश्वास दुणावला आहे.

निवडणुकीतील प्रचाराचा शुभारंभ म्हणून भाजपचे नेते रविवारी नागज येथे होत असलेल्या शेतकरी मेळाव्याकडे पाहत आहे. मेळाव्याला जास्तीत जास्त शेतकऱ्यांना आणण्याचा नेत्यांचा प्रयत्न आहे. शहरातील नगरसेवकांनाही जास्तीत जास्त कार्यकत्रे आणण्याचे आदेश देण्यात आले आहेत. गेले आठ दिवस जिल्ह्य़ातील भाजपचे आमदार मेळावा धुमधडाक्यात व्हावा, यासाठी गावन्गाव िपजून काढत आहेत. खासदार संजयकाका पाटील प्रारंभीच्या काळात लोकसभेसाठी इच्छुक नव्हते, मात्र पक्षानेच आदेश दिल्याने आणि कवठेमहांकाळ-तासगावमध्ये विधानसभेसाठी तुमच्या नावाचा विचार केला जाणार नाही, असे निक्षून सांगितल्याने त्यांनी पुन्हा लोकसभेच्या मदानात उतरण्यासाठी मनाची तयारी केली आहे. त्यांनी खानापूर-आटपाडीचे दौरेही वाढविले आहेत.

या पाश्र्वभूमीवर काँग्रेसची उमेदवारी कोणाला? भाजपविरोधात कोण मदानात उतरणार? याची जिज्ञासा पक्षाबरोबरच नेत्यांनाही आहे. सध्या काँग्रेसच्या उमेदवारीसाठी आमदार विश्वजित कदम आणि वसंतदादा कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील यांचे नाव आघाडीवर असले तरी दोघांचीही विधानसभेलाच प्रथम पसंती असल्याने खासदारकीसाठी ते मदानात उतरण्यास राजी नाहीत. माजी खासदार गुलाबराव पाटील यांचे चिरंजीव पृथ्वीराज पाटील यांचेही नाव चच्रेत आहे, मात्र गेली चार वष्रे विजनवासात असलेले प्रतिक पाटील हेही मदानात उतरण्याच्या तयारीत आहेत. मात्र पक्षातून त्यांच्या नावाला अपेक्षित पाठिंबा मिळत नसल्याने ते दुसऱ्या स्थानी आहेत.

सहकार, गृह, जिल्हा परिषद, पाणी पुरवठा, बांधकाम, नगरविकास या विभागातील कामे प्रामुख्याने राज्य पातळीवरूनच होत असल्याने कार्यकर्ते सांभाळण्यासाठी आणि राजकारणासाठी हेच विभाग महत्त्वाचे ठरत असल्याचे पक्षांच्या नेत्या-कार्यकर्त्यांना दिल्लीपेक्षा मुंबईच बरी वाटते. ते दिल्लीऐवजी मुंबईला पसंती देत आहेत. या उलट दिल्लीचे राजकारण करायचे म्हटले की, भाषिक अडसर तर आहेच, याचबरोबर हिंदी भाषक प्रदेशाचे दिल्लीवर असलेले वर्चस्वही महाराष्ट्रातील ठरावीक नेते वगळले तर अन्यांना भेदता आलेले नाही.

काँग्रेसची उमेदवारी कोणाला मिळणार यावर राजकीय आडाखे ठरणार आहेत. कारण मित्र पक्ष असलेल्या राष्ट्रवादीला काँग्रेसचा उमेदवार रुचणेही महत्त्वाचे आहे. २०१४मध्ये मोदी लाट होती, हे मान्य केले तरी काँग्रेसचे प्रतिक पाटील यांना पराभूत करण्यासाठी राष्ट्रवादीचाही सक्रिय सहभाग दखलपात्रच होता. आताही कदमांच्या घरात उमेदवारी मिळाली तर वसंतदादा घराण्यातून मदतीचा हात पुढे आला तरी मनापासून ही कुमक मतदान केंद्रापर्यंत पोहचेलच याची शाश्वती सध्या तरी देता येत नाही. संजयकाकांनी गेली चार वष्रे स्वपक्षापेक्षा काँग्रेसच्या एका अंतर्गत गटाबरोबरच राष्ट्रवादीला मदतीचा हात देण्यात उणेपणा दाखवला नाही. यामागे केलेल्या मदतीची परतफेड असे कारण सांगितले जात असले तरी बाजार समिती, जिल्हा बँक यामधील तडजोडी या पक्षविरहित राहिल्या. यामुळे काँग्रेसला ही जागा जिंकण्यासाठी अगोदर घरातील बिळे बुजविण्याबरोबरच मित्रांचाही बंदोबस्त करण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत.

राष्ट्रवादीची ‘आघाडी’

काँग्रेस लोकसभा निवडणुकीच्या तयारीचा मुहूर्त कधी काढायचा अशा विवंचनेत असताना राष्ट्रवादीने मात्र लोकसभेबरोबरच विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी कोल्हापुरात मुक्कात ठोकून लोकसभेची तयारी सुरू केली आहे, तर माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेसाठी मोच्रेबांधणी सुरू केली आहे. त्यांचा तासगाव दौरा त्यासाठीच असल्याचे मानले जाते. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यावर राज्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. ते अन्य मतदारसंघांत कार्यरत असल्याने सांगलीची जबाबदारी पवारांवर आल्याचे सांगण्यात येते. असलेल्या जागा कायम राखण्यास प्राधान्य देण्याचा पक्षाचा होरा आहे. तसेच या निमित्ताने घरवापसीसाठी काही मासे गळाला लागतात का याचाही अंदाज घेतला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.