चंद्रपूरच्या औष्णिक वीज प्रकल्पातील दोन संचामध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने ते पडले होते. वीजनिर्मिती घटल्याने राज्यावर वीज संकटाची शक्यता वर्तवली जात असताना ऊर्जा राज्यमंत्री राजेंद्र मुळक यांनी या दोन्ही संचाच्या दुरुस्तीचे आदेश दिले. राज्यातील वीजनिर्मिती लवकरच पूवर्वत होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
राज्यात सर्वच भागांत उन्हाळ्यामध्ये विजेच्या मागणीत मोठी वाढ होत आहे. त्यांना वीज देणे आवश्यक असल्यामुळे दोन संचाच्या दुरुस्तीचे आदेश देण्यात आले आहे. राज्याच्या काही भागात दुष्काळी परिस्थितीमुळे तेथील वीजनिर्मितीवर परिणाम झाला आहे. चंद्रपूरच्या औष्णिक वीज प्रकल्पात गेल्या काही दिवसांपूर्वी तांत्रिक बिघाड झाल्याने दोन संच नादुरुस्त झाले. त्यामुळे वीजनिर्मितीमध्ये आणखी घट झाली होती. राज्यात विजेचा मोठा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. राजेंद्र मुळक यांनी शनिवारी या संदर्भात महावितरणसह वीज मंडळाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यात चंद्रपूरच्या दोन वीज संचाची दुरुस्ती लवकर करण्याचे आदेश दिले. दोन्ही संच लवकर दुरुस्त होऊन वीजनिर्मिती पूवर्वत सुरू होईल, असा विश्वास मुळक यांनी व्यक्त केला.
राज्यातील दुष्काळी भागासाठी पाणी उपलब्ध असलेल्या भागातून पाणी सोडण्याचे राज्य सरकारचे धोरण आहे. पाणी वाटपात समतोल असावा अशी राज्य सरकारची इच्छा असून त्या दिशेने प्रयत्न सुरू आहेत, मात्र जायकवाडीच्या वरच्या धरणातून जायकवाडीमध्ये पाणी सोडण्याचा वाद न्यायालयात पोहोचला. न्यायालयाने त्या संदर्भात विशिष्ट निर्देश दिले आहेत. त्याचा अभ्यास करून लवकर कारवाई करू, अशी माहिती देऊन हे पाणी केव्हापर्यंत सोडले जाईल, किती प्रमाणात सोडले जाईल याची माहिती मात्र मुळक यांनी दिली नाही.