|| रवींद्र जुनारकर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भाटाळी खाणीतून होणारा थेट कोळसा पुरवठा लांबणीवर; प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांची प्रती एकरसाठी १ कोटीची मागणी

चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्राला वेकोलिच्या भाटाळी कोळसा खाणीतून थेट कोळसा पुरवठा करण्यात महत्त्वाचा टप्पा असलेला १७५ कोटींचा ‘पाईप कन्व्हेयर प्रकल्प’ भूसंपादनातील अडचणीमुळे रखडला आहे. जिल्हा प्रशासन प्रती हेक्टर ४० लाख दर देण्याची तयारी दर्शवत असताना २६ प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी प्रती एकरसाठी १ कोटीची मागणी  केली आहे. त्यातच भूसंपादनापूर्वीच एका विदेशी कंपनीशी करार केल्याने वीज महानिर्मिती व विदेशी कंपनी अडचणीत आली आहे.

या प्रकल्पामुळे वीज केंद्राच्या कोळशाचा प्रश्न मार्गी लागणार असल्याने ऊर्जा मंत्रालयाने भूसंपादन प्रक्रिया पूर्ण होण्यापूर्वीच  प्रकल्पाच्या कामाचा करार एम/एस थेनसेंकृप या विदेशी कंपनीसोबत केला. तसेच या कंपनीला कार्यादेशही दिला. कार्यादेश मिळताच कंपनीने काम देखील सुरू केले. मात्र, भूसंपादन प्रक्रिया पूर्ण झाली नसल्यामुळे प्रकल्प रखडला आहे.

या प्रकल्पात जमीन गेलेल्या २६ प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी प्रति एकर १ कोटी रुपये मागितले आहेत. भूसंपादनातील हे अडथळे दूर करण्यासाठी महानिर्मितीचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, प्रकल्पग्रस्त  शेतकरी आपल्या मागणीवर ठाम असल्यामुळे आता नेमका कसा तोडगा काढायचा, हा प्रश्न महानिर्मितीसमोर आहे. प्रकल्प वेळेत सुरू झाला नाही तर १७५ कोटींच्या या प्रकल्पाची किंमत वाढण्याची शक्यता आहे.

यासंदर्भात बोलताना वीज केंद्राचे मुख्य अभियंता जयंत बोबडे म्हणाले की, प्रकल्पग्रस्त शेतकरी प्रतिएकर जमिनीला १ कोटी रुपये दर मागत आहेत. जिल्हा प्रशासनाने ४० लाख रुपये हेक्टर दर सांगितलेला आहे. जमिनीच्या दरातील तफावतीमुळे सध्या हा प्रकल्प रखडला आहे. मात्र, यावर तोडगा काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

असा आहे प्रकल्प

दोन हजार ९२० मेगावॅट वीजनिर्मिती क्षमता असलेल्या चंद्रपूर वीज केंद्राला दरवर्षी कोळसा टंचाईचा सामना करावा लागतो. त्यावर मात करण्यासाठी वेकोलिच्या भाटाळी कोळसा खाणीतून थेट कोळसा पुरवठा करण्यासाठी १७५ कोटीचा पाईप कन्व्हेअर प्रकल्प नियोजित आहे. रस्त्यावरून कोळसा नेताना होणारे प्रदूषण टाळणे व चोरीचे प्रमाण थांबवणे, वाहतुकीवरील होणाऱ्या प्रचंड खर्चात बचत करणे, या उद्देशाने हा प्रकल्प तयार केला गेला आहे. या प्रकल्पात भाटाळी कोळसा खाणीतून कन्व्हेअर बेल्टच्या माध्यमातून कोळसा थेट चंद्रपूरच्या केंद्रातील रेल्वे लोडिंग यार्डपर्यंत आला असता. याची वाहतूक क्षमता प्रतितास  ५०० टन आहे. विशेष म्हणजे, खाणीतून वीज केंद्राला वर्षांला २० लाख २२५ मेट्रिक टन कोळसा पुरवला जाणार होता. भाटाळी खाण ते पद्मापूपर्यंतच्या मार्गावरील ६.१ किलोमीटरचा हा प्रकल्प होता व यातील संपूर्ण वाहतूक ही बंदिस्त स्वरूपात होणार आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Electricity shortage in maharashtra
First published on: 08-09-2018 at 00:50 IST