लोकसत्ता वार्ताहर

डहाणू : डहाणू समुद्रकिनारी असलेल्या हॉटेलमालकांनी कार पार्किंग आणि हॉटेल पोच रस्ता म्हणून सरकारी जागेचा गैरवापर होत आहे. या संदर्भात शासनाने मालकीची १६ गुंठे जागा ताब्यात घेण्याच्या तक्रारीनंतरही महसूल खात्याकडून चालढकल होत असल्याने सरकारी जागेचा पेच कायम आहे.

या वादग्रस्त जागेबाबत शासनाने आपली जागा ताब्यात घेण्यासाठी भूमीअभिलेख डहाणू यांच्याकडून मालकीच्या १६ गुंठे जागा मोजणी करण्याचे आदेश देणे अपेक्षित होते. मात्र, यात चालढकल होत आहे.

डहाणू समुद्रकिनाऱ्याला लागून   ईराणी यांची दोन अलिशान हॉटेल आहेत. या हॉटेलला लागून १६ गुंठे सरकारी जागा आहे. हॉटेल मालकांनी आपल्या जागेत कुंपण घातले असून सरकारी जागेतून हॉटेलला कार पार्किंग व पोच रस्ता जोडला आहे. त्यामुळे सरकारी जागेचा व्यापारी कारणासाठी वापर केला जात असल्याने शासनाने जागेची मोजमाप करून जागेचा गैरवापर थांबवण्याची मागणी होत आहे. याबाबत डहाणू तहसीलदारांकडे केलेल्या तक्रारीच्या सुनावणीदरम्यान सरकारी जागा ताब्यात घेण्याचे अपेक्षित असताना तहसीलदारांनी  जागेची पुन्हा मोजणी करण्याचे हॉटेल मालकांना आदेश दिले आहेत.डहाणू येथे सरकारी जागा मोकळी असताना ती ताब्यात घेण्यासाठी महसूल खाते मागे सरकत असल्याचे चित्र डहाणूत पाहायला मिळत आहे. जागा उपलब्ध नसल्याने डहाणूत अनेक शासकीय कार्यालये भाडय़ाच्या इमारतीमध्ये चालवली जात आहेत.