दिगंबर शिंदे

आठ-दहा पिढय़ांचा साक्षीदार असलेला चारशे वर्षांपूर्वीचा भोसे येथील वटवृक्ष वाचविण्यासाठी वृक्षप्रेमींनी चळवळ उभी केली आणि समाजमाध्यमांतील या चळवळीला राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी पाठबळ दिल्याने हा विषय चर्चेत आला आहे. वटवाघळांपासून कावळा, चिमण्यांचे निवासस्थान असलेल्या या वडाच्या झाडाने चार शतके वारकऱ्यांना सावली जशी दिली तशीच त्यांची दु:खेही ऐकली. महामार्गाच्या विस्तारासाठी या झाडाचा बळी दिला जाणार आहे.

रत्नागिरी- कोल्हापूर- मिरज- सोलापूर या राष्ट्रीय महामार्गाचे सध्या काम सुरू आहे. मिरजेपासून १७ किलोमीटर अंतरावर भोसे हे गाव आहे. रामायणातील दंडकारण्य म्हणून ओळखले जात असलेल्या दंडोबा डोंगराच्या पायथ्यालाच हा वटवृक्ष जुन्या आठवणी सांगत दिमाखात उभा आहे. हा वटवृक्ष त्या परिसरातील एक ऐतिहासिक ठेवा तर आहेच, पण पशुपक्ष्यांचे निवासस्थानही आहे.

पश्चिम महाराष्ट्र, कोकण, उत्तर कर्नाटकमधील आषाढी, कार्तिकी आणि माघी वारीला पंढरीला जाणाऱ्या वारकऱ्यांना आसरा देण्याचे काम या झाडाने केले आहेच, पण आजच्या घडीला या झाडावर शेकडो माकडे वास्तव्याला आहेत. ५७० पाखरे, शेकडो माकडे, लाखोंच्या घरात असलेल्या मुंग्या आणि अगणित कीटक यांचे आश्रयस्थान केवळ विकासाच्या नावाखाली नेस्तनाबूत करण्याचा अधिकार मानवाला निसर्गाने दिला आहे का, असा सवाल निसर्गप्रेमी करीत आहेत.

हे झाड वाचविणे शक्य आहे. यासाठी सह्य़ाद्री वनराईचे कार्यकर्ते दिनेश कदम, प्रवीण शिंदे, गावचे उपसरपंच मनोज पाटील, तासगावचे विनायक कदम आदींनी मला वाचवा अशी चळवळ उभी केली. यल्लमा मंदिराचे विश्वस्त शिवाजी कोळी यांनी सांगितले की, या मार्गासाठी लगतची जागा ही ग्रामपंचायत आणि ट्रस्टची आहे. ही जागा देण्यास कोणाचीही आडकाठी नसताना, झाडाचा बळी केवळ काही लाख रुपयांची बचत करण्यासाठी दिला जात असला तरी हजारो पशुपक्ष्यांच्या जीविताच्या मोलापुढे हा खर्च नगण्यच आहे. तर कोटय़वधींचा प्राणवायू देणारा हा वटवृक्ष ऐतिहासिक साक्षीदार असल्याने वाचविणे महत्त्वाचे ठरणार आहे.  १९७१च्या दुष्काळात पाझर तलावाची उभारणी करीत असताना हे मंदिरही विस्थापित झाले. पौष महिन्यात भरणाऱ्या यात्रेसाठी परिसरातून सुमारे एक लाखभर भाविकांची हजेरी येथे लागते, असेही कोळी यांनी सांगितले.

महामार्ग तयार होत असताना या मार्गावरील मिरजेपासून भोसेपर्यंतच्या १७ किलोमीटर अंतरामध्ये असलेल्या ९२० झाडांचे सरपण झाले. मात्र या चार शतकांच्या वटवृक्षाचे संवर्धन झालेच पाहिजे. यासाठी राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी पुढाकार घेतला आहे. यासाठी त्यांनी केंद्रीय दळणवळणमंत्री नितीन गडकरींना साकडे घातले आहे.

तब्बल ५०० मीटर परीघविस्तार असलेला पंढरीच्या वाटेवरील वारकऱ्यांची सावली असलेला वटवृक्ष आता आधुनिकतेच्या नावाखाली सरपणाची धन होण्याची शक्यता आहे. ६३७ हून अधिक पशुपक्ष्यांच्या मागील पाच-पन्नास पिढय़ांना ज्या झाडाने आसरा दिला तो वटवृक्ष चार शतकांचा साक्षीदार आहे. विकासाच्या नावाखाली वटवृक्षाचा बळी दिला जात आहे. प्राणवायूचा जिताजागता झरा आटवून, नांदत्या पशुपक्ष्यांना विस्थापित करून विकास हवा आहे का, याचा विचार करायलाच हवा. – राहुल गणेशवाडे, भोसे.

गुहागर-जत-विजापूर या महामार्गाची निर्मिती करीत असताना मणेराजुरीच्या माळरानावर असाच एक कोडय़ाचा माळ म्हणून प्रसिद्ध आहे. महामार्गाचे काम सुरू असताना ठेकेदार कंपनीला या ऐतिहासिक स्थळाचा विकास करण्याची कल्पना सुचली. आज त्या ठिकाणी विरंगुळ्याचे ठिकाण म्हणून विकसित केले आहे. याच पद्धतीने या ऐतिहासिक आणि डेरेदार वटवृक्षाची जपणूक केली तर पुढच्या पिढय़ांनाही साक्षीदार आपल्या कथा ऐकवेल.

– विनायक कदम, तासगाव.