बँकांकडून इंग्लिश यादीच्या आग्रहामुळे मदत रखडली

दापोली : आधी निसर्ग चक्रीवादळग्रस्तांच्या नुकसानभरपाईची रक्कम वाढवून मिळण्यासाठीच्या शासकीय प्रक्रियेतील विलंब, त्यानंतर पंचनामे करण्यासाठी लागलेली कर्मचाऱ्यांची जमवाजमव आणि त्यानंतर बँकांनी ‘मराठी नको इंग्लिश’ माहितीचा धरलेला आग्रह यामुळे एक महिन्यानंतरही ३० टक्के चक्रीवादळग्रस्त भरपाईपासून वंचित असल्याचे वास्तव आता समोर आले आहे.

महसूल विभागाने तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक आणि शिक्षक यांचे तब्बल २४० जणांचे पथक पंचनामे करण्यासाठी तयार केले. त्यासाठी जिल्ह्यातील अन्य तालुक्यांतील कर्मचाऱ्यांनाही पाचारण करण्यात आले. या कर्मचऱ्यांनी तब्बल आतापर्यंत तब्बल २५ हजार पंचनामे पूर्ण केले. यामध्ये २२ हजार २८६ घरे, एक हजार २४४ गोठे, २४६ दुकाने, ५८० सार्वजनिक मालमत्ता, २४४ मच्छीमारांचे साहित्य यांचा आहे. त्याचप्रमाणे कृषी विभागानेही ८ हजार ३२९ बागयतदार आणि शेतकऱ्यांचे एकूण दोन लाख ३० हजार हेक्टरवरील नुकसानीचे पंचनामे केले. विशेष म्हणजे महसूल विभागाने वादळग्रस्तांची माहिती बँकेला मराठीत सादर केल्यानंतर तांत्रिक कारण पुढे करत बँकांनी ही माहिती इंग्लिशमध्ये सादर करण्याची सूचना दिली. त्यामुळे पहाटेपासून रात्रीपर्यंत काम करणाऱ्या पंचनामेकर्त्यांचा व्याप आणखी वाढला. वादळग्रस्तांच्या या माहितीचे इंग्लिशकरण व्हायला अनेक दिवस गेल्याने मदतीला वेळ झाला. विशेष म्हणजे या दिवसात लवकरात लवकर मदत मिळेल, अशी नेत्यांची आश्वासने निष्फळ ठरल्याचेही स्पष्ट झाले. एक महिन्यानंतरही अजूनही ३० टक्के वादळग्रस्त शासनाच्या मदतीपासून वंचित आहेत.

हजारो हेक्टर शेतीबागायतीची भरपाईदेखील अजून शिल्लक आहे.

एका बाजूला ही परिथिती असताना खंडीत वीजपुरवठा आणि खंडीत मोबाईल सेवा यामुळे वादळग्रस्तांच्या जीवनात एकाकीपणाचा अंधार आणखीनच दाटून आला आहे. ३४ ठिकाणच्या पाणीपुरवठा योजनांसाठी विद्युतजनित्र, तर ऐन पावसाळ्यात ३४ टँकर प्रशासनाला वापरावे लागले आहेत. महावितरणचे ८९७ कमी दाबाचे आणि २७० उच्च दाबाचे खांब असे एकूण एक हजार १६७ वीजेचे खांब कोसळले. कंडक्टर आणि वायरदेखील खराब झाल्या. नियमित वीजपुरवठय़ाचे गांभीर्य लक्षात घेऊन कोल्हापूर, इचलकरंजी, सांगली, सोलापूर येथून अभियंते आणि कंत्राटदार तातडीने बोलावण्यात आले. विशेष म्हणजे गावागावातील ग्रामस्थांनी वेगाने श्रमदान करून नवीन खड्डे खणण्याचे आणि खांब उभे करण्याचे काम तातडीने पूर्ण केले. पण एवढय़ा स्थानिक श्रमांची मदत होऊनही  नियोजनाअभावी महावितरण ३० दिवसांत  बाराशे खांबांवर वायरी ओढू शकलेले नाहीत. केळशी, मांदिवली, डौली, वांझळोली, सुकोंडी, आंजर्ले, तोंडली, खरवते ही गावे अद्याप अंधारात आहेत. वीजेबरोबरच मोबाईल सेवाही नाही, अशा परिस्थितीत वादळग्रस्तांचे हाल अजूनही शासकीय यंत्रणा दूर करू शकलेले नाही, हे स्पष्ट झाले आहे. वादळग्रस्त भागात मोठमोठय़ा नेत्यांचे दौरे होऊनही वादळग्रस्तांचे अश्रू कोणी पुसू शकलेले नाहीत, अशी खंतही दापोलीवासीयांमध्ये व्यक्त होत आहे.