काँग्रेसच्या मुख्यमंत्री बाबांनी शेवटच्या महिन्यात मोठय़ा ‘लक्ष्मीदर्शना’साठी दिवसरात्र सरकार चालविल्याचा आरोप भाजपचे अध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी येथे केला.
वाई विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाचे उमेदवार पुरुषोत्तम जाधव यांच्या प्रचारार्थ भाजी मंडईत आयोजित सभेत फडणवीस बोलत होते. या वेळी प्रतापगड उत्सव समितीच्या निमंत्रक विजयाताई भोसले, जिल्हाध्यक्ष भरत पाटील, अविनाश फरांदे, प्रशांत जगताप, प्रदीप क्षीरसागर आदी उपस्थित होते.
महाराष्ट्र सिंचन घोटाळय़ात पहिला आहे. तसाच बलात्कार, लहान मुलांवर होणा-या लैंगिक अत्याचारात, वीजटंचाईतही पहिला आहे. या सरकारच्या काळात कायदा सुव्यवस्थचे तीन तेरा वाजले आहेत. राज्यावर साठ हजार कोटींचे कर्ज आहे. राज्यात मोठमाठे घोटाळे या सरकारने केले आहेत. राज्यातील प्रतिव्यक्ती २७ हजाराचे कर्ज यांनी करून ठेवले आहे. शिक्षणाची अवस्था अत्यंत वाईट आहे. आठवीपर्यंतच्या मुलांना अद्यापपर्यंत आद्याक्षराची ओळखही नाही. या राज्यात पूर्वी शिक्षणमहर्षी तयार व्हायचे तेथे यांनी शिक्षणाचे व्यापारीकरण केले आणि शिक्षणसम्राट तयार केले आणि शिक्षणाचे व्यापारीकरण केले. शेतक-यांना अस्थिर करण्याचे काम यांनी केले असे सांगून फडणवीस म्हणाले, राज्याची तिजोरी रिकामी करण्याचे काम या सरकारने केले. काँग्रेस आघाडीच्या काळात विकास झाला नाही, सिंचन, रस्ते, विजेचे प्रकल्प पूर्ण झाले नाहीत.पायाभूत सुविधा देण्यात हे सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे. उलट यांनी साडेअकरा कोटीचा घोटाळा केल्याचा पुनरुच्चार केला. कवठे केंजळसारख्या पाच-पाच वेळा भूमिपूजन झालेल्या छोटय़ा छोटय़ा योजना पंधरा वर्षांत पूर्ण करता आल्या नाहीत. येथील काँग्रेस व राष्ट्रवादीचा उमेदवार एक योजना आणतो आणि दुसरा बंद करतो असे हे दोघेच चक्र फिरवत असतात.
पण मतदारांनो, आता तुम्ही घाबरू नका. आता तुम्हाला भाजपच्या व मोदींच्या नेतृत्वाखाली परिवर्तनाची संधी मिळाली आहे. तुम्ही आम्हाला पूर्ण बहुमत द्या. येथील पुरुषोत्तम जाधव यांनाही विजयी करा. मोदींनी जपान, अमेरिका आणि चीनमधून मोठी गुंतवणूक आणली आहे. त्यासाठी आपणास कुशल मनुष्यबळ द्यावे लागणार आहे. २ कोटी लोकांना आम्ही प्रशिक्षित करून रोजगार देणार आहोत. भाजपच देशाला व राज्याला सक्षम सरकार देऊ शकतो. असे सांगून त्यांनी लकवा मारलेल्या काँग्रेसच्या बाबाने सहय़ांसाठी त्याचा हात हलत नव्हता म्हणून शेवटी याने दिवसरात्र काम करून मोठे लक्ष्मीदर्शन केले, तर दुस-या दादाचा हात कधी थांबतच नव्हता. या सर्वाना पराभव दिसत होता म्हणून राज्यातील अनेक आजीमाजी आमदार भाजपच्या दारात आम्हाला घ्या म्हणून तीनतीन दिवस चकरा मारत होते. आमच्याकडेच समाजाभिमुख उमेदवार असल्याने आम्ही कित्येकांना घेतलेच नाही असेही शेवटी फडणवीस यांनी सांगितले. पुरुषोत्तम जाधव यांनी शिवसेनेने माझी फसवणूक केल्याचा आरोप केला. या वेळी मोठय़ा संख्येने कार्यकत्रे उपस्थित होते.
संग्रहित लेख, दिनांक 9th Oct 2014 रोजी प्रकाशित
शेवटच्या महिन्यात ‘लक्ष्मीदर्शना’साठी बाबांचे दिवसरात्र सरकार- फडणवीस
काँग्रेसच्या मुख्यमंत्री बाबांनी शेवटच्या महिन्यात मोठय़ा ‘लक्ष्मीदर्शना’साठी दिवसरात्र सरकार चालविल्याचा आरोप भाजपचे अध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी येथे केला.

First published on: 09-10-2014 at 03:45 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fadnavis criticized prithviraj chavan