विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र लिहिलं आहे. या पत्रातून त्यांनी काही मुद्द्यांवर भाष्य केले असून, “यालाच महाराष्ट्र मॉडेल म्हणायचे का आणि ते देशाने स्वीकारायचे का?,” असं प्रश्नही उपस्थित केला आहे. यावरून आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी फडणवीसांवर निशाणा साधला असून, पंतप्रधान मोदींना पत्र लिहिण्याचं धाडस फडणवीसांनी करावं, असं पटोलेंने म्हटलं आहे.

“देशाचं रूपांतर स्मशानभूमीत करणाऱ्या, पंतप्रधान मोदींना पत्र लिहण्याचे धाडस फडणवीसांनी करावं” असं नाना पटोलेंनी ट्विट केलं असून, सोबत फडणवीसांनी सोनिया गांधांनी पाठवलेलं पत्र देखील जोडलं आहे.

काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह देशातील विरोधी पक्षांच्या नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिलेलं आहे. त्यानंतर राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू झाल्याचं दिसत आहे. विरोधी पक्षाच्या नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिलेल्या पत्रानंतर आज फडणवासींना सोनिया गांधींना लिहिलेल्या पत्रावरून नवी चर्चा सुरू झाल्याचे दिसत आहे.

यालाच महाराष्ट्र मॉडेल म्हणायचे का आणि ते देशाने स्वीकारायचे का?; फडवीसांचा सोनियांना सवाल

दरम्यान, “करोनाला गांभीर्याने न घेतल्यानेच करोना संकट हाताळण्यात मोदी सरकार सपशेल अपयशी ठरले आहे. खासदार राहुल गांधींनी १२ फेब्रुवारी २०२० रोजी करोना त्सुनामीसारखं संकट असल्याचा इशारा दिला होता. परंतु पंतप्रधान मोदींपासून फडणवीसांपर्यंत भाजपा नेत्यांनी आम्ही त्यांना गांभाीर्याने घेत नाही, असे म्हणत दुर्लक्ष केले. परिणामी आज देशात दररोज ४ लाखांपेक्षा अधिक करोना रूग्ण तसेच चार हजारांपेक्षा जास्त मृत्यू होत आहेत. याला सर्वस्वी केंद्रातील भाजपा सरकारचा अहंकार व गलथानपणा जबाबदार आहे. सोनिया गांधी यांना पत्र लिहून देशाचे स्मशान बनविणाऱ्या पंतप्रधान मोदींच्या पापावर पांघरून घालण्याचा प्रयत्न फडणवीस करत आहेत. त्यांनी मोदींना पत्र लिहिण्याचं धाडस दाखवावं.”, असं आव्हान काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी केलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तसेच, मोदी सरकारने सत्तेत आल्यापासून केंद्र-राज्य विभाजनाचं पाप केलं. आता मात्र त्यांनी आपली चूक मान्य करुन लसीकरणासाठी राष्ट्रीय धोरण ठरवावे. राज्यांमध्ये कुठलाही भेदभाव न करता लस उपलब्ध करुन द्यावी. लस कुठून आणणार, कधीपर्यंत देणार याबाबतीत स्पष्टता आणावी. असं देखील नाना पटोलेंनी या अगोदर म्हटलेलं आहे.