तिच्या अवयवदानातून काहींना जीवदान

डॉक्टर झालेल्या भावाच्या पदवीदान समारंभासाठी जात असताना मुंबईमध्ये भरधाव कारच्या धडकेत जखमी झालेल्या डॉक्टर दीपाली लहामटेची जगण्यासाठी सुरू असणारी धडपड आज संपली. सुमारे आठवडाभर मृत्यूशी झुंज दिल्यानंतर आज तिची प्राणज्योत मालवली. मात्र डॉक्टर दीपालीच्या कुटुंबीयांनी अवयव दान करण्याचा निर्णय घेतल्याने हे जग सोडून जाताना तिने काहींना जीवनदान दिले आहे.

तालुक्यातील राजूर येथील वैद्यकीय अधिकारी बुधाजी लहामटे यांची ती मुलगी होती. बीडीएस झाल्यानंतर मुंबई येथील नायर रुग्णालयाच्या दंत महाविद्यलयात सध्या ती इंटर्नशिप करत होती. तिच्या भावानेही नुकतीच एमबीबीएस पदवी मिळवली आहे. भावाच्या पदवीदान समारंभासाठी म्हणून जे. जे. जिमखान्याकडे ती पायी चालत निघाली होती. मरीन ड्राइव्ह येथील तारापोरवाला मत्स्यालयाजवळ सिग्नलला रस्ता ओलांडत असताना एका होंडा सिटी कारने दीपालीला सिग्नल तोडत जोरदार धडक दिली. शिखा झवेरी ही महिला कार चालवत होती. अपघात झाल्यानंतर दीपालीला मदत करण्याऐवजी शिखाने पळ काढला. मात्र काही जणांनी पाठलाग करून तिला पकडले. शनिवार, दि. २४ मार्च रोजी ही घटना घडली.

अपघातानंतर काही पादचा?ऱ्यांनी तिला रुग्णालयात दाखल केले. तेव्हापासून ती अत्यवस्थ होती. अखेर आठवडाभरानंतर आज तिचा जगण्यासाठी सुरू असणारा संघर्ष संपला. तिचे  निधन झाले.

तिचे वडील डॉ. बुधाजी लहामटे हे नुकतेच सेवानिवृत्त झाले आहे. तर तिचा भाऊ  अभिनय, बहीण सारिका हे दोघेही डॉक्टर आहेत. अकोलेचे माजी सभापती बाळासाहेब देशमुख हे तिचे मामा होत तर जिल्हा परिषद सदस्य डॉ. किरण लहामटे तिचे चुलत बंधू होत. वैद्यकीय व सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणा?ऱ्या तिच्या कुटुंबीयांनी अवयव दान करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे जाता जाताही डॉ. दीपाली अनेकांना जीवन देऊन गेली. एका हुशार हसतमुख व्यक्तिमत्त्वाच्या या तरुणीच्या अपघाती निधनाबद्दल तालुक्यात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.