News Flash

मुख्यमंत्र्यांच्या धमकीला घाबरत नाही, त्यांनी माझी कुंडली काढावी: राजू शेट्टी

फडणवीस यांना थेट आव्हान

शेतकरी संपाच्या आड काही राजकीय पक्षांचे नेते हिंसा घडवत असून, त्यांची नावे आमच्याकडे आहेत, असं म्हणणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सत्तेतील सहभागी घटकपक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि खासदार राजू शेट्टी यांनी थेट आव्हान दिलं आहे. मुख्यमंत्र्यांच्या धमकीला घाबरत नाही. त्यांनी आधी माझी कुंडली काढावी, असं ट्विट शेट्टी यांनी केलं आहे.

शेतकरी आंदोलनाला फारसा प्रतिसाद मिळत नाही. आंदोलनात राजकीय कार्यकर्ते घुसले आहेत. ते तोडफोड व जाळपोळीचे प्रकार करीत आहेत, शेतकऱ्यांचा संपाला पाठिंबा नाही, शेतकऱ्यांच्या आडून राजकारण सुरू आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस काल पत्रकार परिषदेत म्हणाले होते. त्यावर राजू शेट्टी यांनी जोरदार हल्ला चढवला होता. जर आंदोलनात दम नाही, असे सरकारचे म्हणणे असेल तर सरकार शेतकऱ्यांना का घाबरलं आहे, असा सवाल त्यांनी विचारला होता. त्यानंतर आज पुन्हा शेट्टी यांनी मुख्यमंत्र्यांवरच हल्लाबोल केला आहे. मुख्यमंत्र्यांच्या धमकीला मी घाबरत नाही. त्यांनी आधी माझी कुंडली काढावी, असं थेट आव्हानच शेट्टी यांनी मुख्यमंत्र्यांना दिलं आहे.

दरम्यान, महाराष्ट्रातील शेतकरी आंदोलन आता देशव्यापी करण्यात येणार आहे. त्यासाठी १६ जून रोजी दिल्लीत गांधी पीस फाऊंडेशन येथे देशभरातील शेतकरी संघटनांच्या प्रमुखांची बैठक आयोजित करण्यात आल्याची माहिती शेट्टी यांनी दिली. केंद्र सरकारला त्यांनी दिलेल्या आश्‍वासनांची जाणीव करून देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितलं.

दरम्यान, सरकारसोबत चर्चा करणार का, या प्रश्नावर मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून चर्चेचा प्रस्ताव अद्याप आलेला नाही, असे त्यांनी सांगितले. सुकाणू समितीची बैठक ८ जूनला नाशिकला होणार असून त्यापूर्वी प्रस्ताव आला तरी समितीच्या बैठकीत चर्चेबाबत निर्णय घेतला जाईल. एखाद-दुसऱ्या संघटनेशी चर्चा करून तोडगा काढण्याचे प्रकार चालणार नाहीत. सर्वाशी एकत्रित चर्चा करून सुकाणू समिती आंदोलनाची रूपरेषा आणि चर्चेबाबत भूमिका ठरवील. संघटनेची अनेक आंदोलने झाली व आमचे चर्चेचे दरवाजे कायम खुले असतात, असे शेट्टी यांनी स्पष्ट केले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 7, 2017 10:27 am

Web Title: farmers strike in maharashtra mp raju shetti challange chief minister devendra fadnavis
Next Stories
1 खालापूरजवळ शिरवली नदीत पाच जणांचा बुडून मृत्यू
2 SSC Results 2017: दहावीचा निकाल पुढील आठवड्यात!
3 मान्सूनची गती थबकल्याने शेतकरी चिंतेत
Just Now!
X