लोकसभा निवडणुकीच्या निकालाच्या पाश्र्वभूमीवर काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी रविवारी माळेगावला खंडोबारायाचे दर्शन घेतले. त्यानंतर रविवारी सकाळपर्यंत ते स्वस्थ होते, पण निवडणूक आयोगाच्या अधिकार कक्षेच्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी पहिल्या सत्रातच दिलेल्या निकालामुळे चव्हाणांच्या गोटात खळबळ उडाली. त्यांचे निकटवर्तीय अस्वस्थ झाले आणि नंतर दिवसभर खलबतं सुरू होती.
सर्वोच्च न्यायालयाचा निकाल सोमवारी जाहीर होणार, हे नांदेडमध्ये अनेकांना माहीत होते. वृत्तवाहिन्यांवरून त्याची माहिती कळताच चव्हाणांच्या गोटात खळबळ उडाली. ही बातमी आली तेव्हा चव्हाण त्यांच्या शिवाजीनगर येथील घरीच होते. नंतर ते बाहेर गेले. त्यामुळे निवासस्थानाच्या परिसरात शुकशुकाट होता. उज्ज्वल इंटरप्रायजेसच्या दालनातील कार्यालयात चव्हाण नंतर पोहोचले. दिल्ली येथील निकालाची प्रत आणि तपशील वकिलांकडून त्यांनी समजून घेतल्याचे समजते. हा निकाल म्हणजे निवडणूक आयोगाकडे दाखल असलेल्या प्रकरणातील खऱ्या अर्थाने सुरुवात आहे. तेथे आम्ही आमची बाजू मांडू, असे चव्हाण यांनी सांगितले. न्यायालयाच्या निर्णयाचा आदर करतो, पण हा निर्णय म्हणजे मूळ प्रकरणात माझ्याविरुद्धचा निकाल नाही, असेही ते म्हणाले. सायंकाळपर्यंत चव्हाणांच्या घरी समर्थकांची वर्दळ होती.