प्रशांत देशमुख

भाजपाचे नवनियुक्त प्रदेश सचिव राजेश बकाणे यांच्या सत्कारप्रसंगी जमावबंदीच्या आदेशांचे उल्लंघन झाल्याचे कारण देत पक्षाच्या चाळीस पदाधिकाऱ्यांवर आज गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यातून सत्कारममूर्ती बकाणे मात्र बचावले आहेत.

भाजपाची प्रदेश कार्यकारिणी नुकतीच जाहीर झाली. त्यात वर्धा जिल्ह्यातून भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष राजेश बकाणे यांची प्रदेश सचिव म्हणून वर्णी लागली. यानिमित्याने आज त्यांचा धंतोली येथील जिल्हा कार्यालयात सत्कार करण्याचे ठरले. त्यानुसार सकाळी अकरा वाजता आमदार डॉ. पंकज भोयर व सत्कामूर्ती बकाणे कार्यालयात पोहोचले. याबाबत प्रशासनाला माहिती होताच जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने लागू असलेल्या जमावबंदी कायद्याचे उल्लंघन होत असल्याची तक्रार झाली.

त्यानंतर रामनगर पोलिसांनी भाजपा कार्यालयात पोहोचून चौकशी केल्यावर ३५ ते ४० कार्यकर्ते हजर असल्याचे दिसून आले. शहराध्यक्ष प्रशांत बुरले व पवन परियाल, किसान मोर्चाचे प्रशांत इंगळे, न. प. उपाध्यक्ष प्रदीप ठाकूर तसेच गुंडू कावळे, सुनिता ढवळे, मंजूषा दुधबडे, निलेश किटे, विरू पांडे, श्रीधर देशमुख, शितल ठाकरे, गिरिष कांबळे, अशोक कलोडे व अन्य पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल झाले आहेत. या कार्यक्रमाबाबत बकाणे यांनी ट्विट करीत माहिती दिली होती.