सोलापूर : उंच आकाशात झेप घेत उडणारे औटगोळे, त्यातून सर्वत्र फैलावणाऱ्या रंगीबेरंगी सुंदर नक्षीदार तारका, एकापेक्षा एक सरस सुंदर धबधबे, आकाशगंगा तर दुसऱ्या बाजूला सध्याच्या सामाजिक परिस्थितीवर नेमकेपणाने बोट ठेवून घडविलेला कलाविष्कार घडवत शोभेच्या दारूकामाच्या भव्य सादरीकरणाबरोबरच यंदा प्रथमच ‘लेझर शो’च्या माध्यमातून ग्रामदैवत सिध्देश्वर महाराजांच्या चित्ररूपी चरित्राचे दर्शन घडले. या नयनरम्य सोहळ्यासह ‘कप्पडकळ्ळी’ (वस्त्रविसर्जन) कार्यक्रमाने सिध्देश्वर यात्रेची सांगता झाली.

गुरुवारी चौथ्या दिवशी सिध्देश्वर यात्रेच्या अंतिम टप्प्यात होम मैदानावर पूर्वापार परंपरेनुसार रात्री शोभेचे नितांत सुंदर दारूकाम सादर करण्यात आले. याशिवाय यंदा प्रथमच नावीन्यपूर्ण ‘लेझर शो’चेही आयोजन करण्यात आले होते. यात्रेत शोभेच्या दारूकाम सादरीकरणात गेली अनेक वर्षे प्रथम क्रमांक पटकावणारे सोलापूरचे एम. ए. पटेल यांच्यासह दोघा कलावंतांनी शोभेचे दारूकाम सादर केले. होम मैदानावर आयोजित शोभेच्या दारूकामासह प्रथमच आयोजित ‘लेझर शो’ पाहण्यासाठी सायंकाळी सातपासूनच गर्दी वाढायला सुरूवात झाली होती.

एम. ए. पटेल यांनी आपल्या वैशिष्टय़पूर्ण परंपरेप्रमाणे  दारूकामाच्या आतषबाजीतून देशभक्ती आणि स्त्रीशक्ती सन्मानाचा संदेश पोहोचविला. ‘काश्मीर तो हमारा, पीओके भी हमारा’ असा संदेश शोभेच्या दारूकामातून दिला गेला तेव्हा त्यास प्रेक्षकांनी दाद दिली. ‘नारी का सन्मान, देश का अभिमान’ हे घोषवाक्यही दाद देऊन गेले. स्वच्छता अभियानावरही शोभेच्या दारूकामातून प्रबोधन करण्यात आले. सुदर्शन चक्र, धबधबा, सोनेरी वृक्ष, नर्गिस वृक्ष, पृथ्वी, चांदणी चक्र आदी स्वरूपात कलाविष्कार घडविण्यात आला. त्यातून मनोरंजनाबरोबरच प्रबोधनही झाले.

सिध्देश्वर यात्रेत पारंपारिक शोभेच्या दारूकाम सादरीकरणात कपात करून यंदा प्रथमच ‘लेझर शो’दाखविण्यात आला. बंगळुरूच्या चेतन गौडा यांच्या श्रीकृष्ण ड्रीम्स या संस्थेने लेझर शो दाखविला. त्यातून ग्रामदैवत सिध्देश्वर महाराजांचे जीवनचरित्राचे अद्भुत दर्शन घडले. रेवणसिध्देश्वर महाराजांनी ग्रामदैवत सिध्देश्वर महाराजांच्या माता-पित्याला दिलेला दृष्टान्त, मल्लिकार्जुन महाराजांबरोबर सिध्देश्वरांची झालेली भेट, त्यांच्या ओढीने सिध्देश्वर महाराजांचे श्रीशैलकडे झालेले प्रस्थान, तेथेही मल्लिकार्जुनाचे दर्शन न झाल्याने सिध्देश्वर महाराजांनी उंच डोंगरावरून दरीत स्वत:ला झोकून देत देहत्यागाचा केलेला प्रयत्न, त्याचवेळी मल्लिकार्जुन महाराजांनी दिलेले दिव्य दर्शन यांसह विविध प्रसंग ‘लेझर शो’च्या माध्यमातून दाखविण्यात आले.

या कार्यक्रमास जिल्हा व सत्र न्यायाधीश ओम. आर. देशपांडे,अतिरिक्त सत्र न्यायाधीश यू. एल.जोशी, वाय. जी. देशमुख आदींसह पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, पालिका आयुक्त दीपक तावरे आदींची उपस्थिती होती. यात्रेत प्रथमच ‘लेझर शो’च्या माध्यमातून भाविकांना काही वेगळे देण्याचा प्रयत्न झाल्याचे सिध्देश्वर मंदिर समितीचे अध्यक्ष धर्मराज काडादी यांनी सांगितले. येत्या काही काळात सिध्देश्वर मंदिर तलाव परिसरातही ‘लेझर शो’चा प्रयोग सादर करण्याचा मनोदयही त्यांनी बोलून दाखविला. यात्रेची सांगता ‘कप्पडकळ्ळी’ (वस्त्रविसर्जन) या पारंपरिक कार्यक्रमाने झाली. मल्लिकार्जुन मंदिरात दुपारी हा कार्यक्रम संपन्न झाला.