लोकसत्ता प्रतिनिधी
अकोला : जिल्ह्यात एकाच दिवसांत पाच जणांचा मृत्यू व २७ नव्या रुग्णांची नोंद शनिवारी झाली. आतापर्यंत ६४ जणांचा मृत्यू झाला असून, जिल्ह्यातील एकूण रुग्ण संख्या ११६३ झाली. अकोला जिल्ह्यात गत १५ दिवसांत ३० करोनाबाधितांचे बळी गेल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. दररोज सरासरी दोन जणांचा मृत्यू होत आहे. मृत्यूदर झपाट्याने वाढत असल्याने खळबळ उडाली आहे.

शहरासह जिल्ह्यात करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण वेगाने वाढले. करोनाबाधित रुग्णांचे मृत्यू रोखण्यात अपयशच आले आहे. त्यामुळे गत १५ दिवसांत दररोज रुग्णांचे मृत्यू झाले आहेत. ६ ते २० जूनपर्यंत १५ दिवसांत ३० करोनाबाधित रुग्ण दगावले आहेत. शनिवारी एकाच दिवसांत पाच करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू ओढवला. या आठवड्यांत दुसºयांदा एकाच दिवसांत पाच मृत्यूची नोंद झाली. या अगोदर १४ जून रोजीही पाच रुग्णांचा मृत्यू झाला होता. जिल्ह्यातील एकूण ३२३ तपासणी अहवाल आज प्राप्त झाले. त्यापैकी २९६ अहवाल नकारात्मक, तर २७ जणांचे अहवाल सकारात्मक आले आहेत. त्यामुळे एकूण रुग्ण संख्या ११६३ वर पोहचली. सध्या रुग्णालयात ३४७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

दरम्यान, शहरातील अकोट फैल शंकर नगर येथील रहिवासी ६३ वर्षीय पुरुष व गुलजारपूरा येथील ६२ वर्षीय पुरुष रुग्णाचा आज मृत्यू झाला. दोन्ही रुग्ण १६ जून रोजी दाखल झाले होते. पातूर येथील ३५ वर्षीय महिलेचाही मृत्यू झाला असून त्यांना १५ जून रोजी दाखल दाखल करण्यात आले होते. शहरातील मोठी उमरी येथील ५५ वर्षीय रुग्णाला ८ जून रोजी शासकीय वैद्याकीय महाविद्याालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना पुढील उपचारासाठी खासगी ओझोन रुग्णालयात १४ जून रोजी पाठविण्यात आले. त्याठिकाणी त्यांचा आज मृत्यू झाला. तर अकोट अकबर प्लॉट येथील ७५ वर्षीय पुरुष रुग्णाचा १९ जून रोजी रात्री मृत्यू झाला. त्यांना ५ जून रोजी दाखल करण्यात आले होते. या एकूण पाच मृत्यूची नोंद आज झाली.

आज दिवसभरात २७ जणांचे अहवाल सकारात्मक आले. सकाळी प्राप्त अहवालात २५ रुग्ण आढळून आले आहेत. त्यात नऊ महिला व १६ पुरुष आहेत. त्यात आदर्श कॉलनी येथील चार, शंकर नगर, अशोक नगर, न्यू साई नगर, जुने शहर येथील प्रत्येकी दोन, तर रामदास पेठ, अकोट फैल, बोरगांव मंजू, मुकुंद वाडी, हरिहरपेठ, हैदरपूरा, कच्ची खोली, खदान, शास्त्री नगर, गायत्री नगर, सोनटक्के प्लॉट, सिंधी कॅम्प व बुलढाणा येथील रहिवासी प्रत्येकी एक रुग्ण आहे. आज सायंकाळी आणखी दोन रुग्णांची भर पडली. ते दोन्ही पुरुष असून त्यातील जवाहर नगर व जठारपेठ येथील प्रत्येकी एक रुग्ण आहे.

साडेसातशेवर रुग्णांची करोनावर मात
अकोला जिल्ह्यात आतापर्यंत ७५२ रुग्णांची करोनावर मात केली आहे. करोनातून बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. त्यात आज दुपारनंतर रुग्णालयातून सोडण्यात आलेल्या १० जणांचा समावेश आहे. त्यातील सहा जणांना घरी पाठवण्यात आले तर उर्वरित चार जणांना कोविड केअर सेंटर येथे निरीक्षणात ठेवण्यात आले आहे.

७१७८ अहवाल नकारात्मक
जिल्ह्यातील एकूण ८३४४ जणांचे नमुने पाठवण्यात आले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे ८०२२, फेरतपासणीचे १३४ तर वैद्याकीय कर्मचाºयांचे १८८ नमुने होते. आजपर्यंत एकूण ८३४१ अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण नकारात्मक अहवालांची संख्या ७१७८, तर सकारात्मक अहवाल ११६३ आहेत.

डॉ. प्रदीप बोरकर यांचे निधन
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्याापीठातील कापणी पश्चाात कृषी प्रक्रिया अभियांत्रिकी व तंत्रज्ञान विभागाचे प्रमुख डॉ. प्रदीप बोरकर यांचे शनिवारी दुपारी खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. ते ५५ वर्षांचे होते. अभ्यासू संशोधक व प्राध्यापक म्हणून त्यांची ख्याती होती. विद्याापीठाच्या यशात त्यांचा मोठा वाटा होता.