अबूजमाडमधील पेरिमिलीभट्टी जंगलातील कारवाई

गडचिरोली : भामरागड उपविभागांतर्गत येणारे उपपोलीस ठाणे लाहेरीजवळील पेरिमिलीभट्टी जंगलात गडचिरोली पोलीस दलाच्या सी-६०चे जवान व नक्षलवाद्यांमध्ये चकमक उडाली. या चकमकीनंतर पोलीस दलाने पाच जहाल नक्षलवाद्यांना अटक केली.  त्यांच्याकडून मोठय़ा प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे.

रैणू सोनू वड्डे (२०), बंडू चक्कू वड्डे (२५), सुखराम सोमा उसेंडी (४०), इरपा उसेडी (३०), केये सायबी वड्डे (४०), अशी अटक करण्यात आलेल्या जहाल नक्षलवाद्यांची नावे आहेत. त्यांच्यावर अनेक पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल आहेत. आज बुधवारी लाहेरीजवळील पेरमिलीभट्टी जंगलात सी-६० दलाचे जवान नक्षलविरोधी अभियान राबवत असताना नक्षलवाद्यांनी गोळीबार केला. पोलिसांनी  प्रत्युत्तरादाखल गोळीबार केला असता नक्षलवादी घनदाट जंगलाचा फायदा घेत पसार झाले.  सी-६०च्या जवानांनी  पाठलाग करीत पाच जहाल नक्षलवाद्यांना अटक केली. अटक करण्यात आलेले सर्व नक्षलवादी हे छत्तीसगड राज्यातील आहे. त्यांच्याकडून तीन हत्यारे व मोठय़ा प्रमाणात नक्षल साहित्य जप्त करण्यात आले आहे. पाचही नक्षलवाद्यांविरोधात लाहेरी उपपोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास लाहेरी पोलीस करीत आहेत. गडचिरोली पोलीस दलाच्या या शौर्यपूर्ण कामगिरीचे पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी कौतुक केले आहे.