शहरातील एसटी बस डेपोचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. बससेवेच्या इतरही समस्या आहेत. तत्कालीन मंत्र्यांनी अनेकदा बस डेपोबाबत जाहीर कार्यक्रमात मुहूर्त सांगितले मात्र त्यांनी दिलेल्या आश्वासनाची पूर्तता केली नसल्याची टीका राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी भाजपचे माजी मंत्री राम शिंदे यांचे नाव न घेता केली.

कर्जत-जामखेड मतदारसंघातील एसटी बससेवेच्या प्रश्नाबाबत आ. रोहित पवार यांनी मुंबई येथे एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक रणजितसिंह देओल यांची भेट घेतली. एसटी बससेवेच्या संदर्भातील विविध प्रश्नांबाबत चर्चा करून ते प्रश्न मार्गी लावण्यासाठी लेखी निवेदन दिले.

निवडणुकीच्या प्रचारादरम्यान आ. पवार यांनी मतदारसंघात विविध ठिकाणी भेटी दिल्या होत्या. अनेक गावांमध्ये तर बस जातच नसल्यामुळे तेथील मुला-मुलींच्या शिक्षणाबरोबरच ग्रामस्थांनाही अनेक अडचणींचा सामना करावा लागतो, गावापासून इतर ठिकाणी शिक्षण घेण्यासाठी जावे लागते, मात्र एसटी बससेवेच्या गैरसोयीमुळे अनेक विद्यार्थिनींना शिक्षण पूर्ण करता आले नाही आदी तक्रारी करण्यात आल्या होत्या. सध्या दोन्ही तालुक्यातील काही गावांमध्ये एसटीच्या फेऱ्या वाढवण्याची गरज आहे, तर काही ठिकाणी बस थांब्यांचीही आवश्यकता आहे. कर्जत-जामखेडमध्ये एसटी बसची संख्याही कमी आहे. त्यामुळे प्रवाशांना तासन्तास बसची वाट पाहावी लागते आदी समस्या मांडून आ. पवार यांनी रणजितसिंह देओल यांच्याशी चर्चा करून ते प्रश्न सोडवण्याची मागणी केली.

सकारात्मक दृष्टिकोनातून तातडीने हे प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन देओल यांनी यावेळी दिले.