कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी शनिवारी सकाळी कृष्णकुंजवर जाऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. हर्षवर्धन जाधव अचानक राज ठाकरे यांच्या भेटीसाठी पोहोचल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. येत्या २३ जानेवारीला मुंबईत होणाऱ्या मनसेच्या महाअधिवेशनात हर्षवर्धन जाधव पुन्हा मनसेत प्रवेश करणार का? अशी चर्चा सुरु झाली आहे. प्रथमच मनसेचे महाअधिवेशन होत असून, यामध्ये पक्षाच्या भविष्यातील वाटचालीसंबंधी अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे.

कोण आहेत हर्षवर्धन जाधव?
हर्षवर्धन जाधव हे मनसेचे माजी आमदार आहेत. २००९ सालच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत राज्यभरातून मनसेचे १३ आमदार निवडून आले होते. त्यात हर्षवर्धन जाधव सुद्धा होते. औरंगाबादमधील कन्नड विधानसभा मतदारसंघातून त्यांनी विजय मिळवला होता. पण पाचवर्षाच्या आतच त्यांचे पक्षातंर्गत मतभेद झाल्यामुळे त्यांनी मनसेला सोडचिठ्ठी दिली. त्यानंतर हर्षवर्धन जाधव यांची अपक्ष म्हणून निवडणूक लढवत विजय मिळवला. २००९ ते २०१९ अशी दहावर्ष कन्नडच्या जनतेने त्यांना विधानसभेवर प्रतिनिधीत्व करण्याची संधी दिली.

आता ते स्वत:च्या शिव स्वराज्य पक्षाचे प्रमुख आहेत. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत हर्षवर्धन जाधव यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली. हर्षवर्धन जाधव ही निवडणूक जिंकू शकले नाहीत. पण त्यांना मोठया प्रमाणात मते मिळाली. त्यामुळे शिवसेनेच्या चंद्रकांत खैरे यांचा पराभव झाला व एमआयएमचे इम्तीयाज जलील निवडून आले. त्यावरुन शिवसेना आणि त्यांच्यामध्ये वादावादी सुद्धा झाली.

हर्षवर्धन जाधव रावसाहेब दानवेंचे जावई
हर्षवर्धन जाधव हे भाजपाचे माजी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचे जावई आहेत. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत कन्नडमधून शिवसेनेच्या उदयसिंग राजपूत यांनी त्यांचा पराभव केला. निवडणूक काळात शिवसेनेवर केलेली टीका भारी पडल्याचे बोलले जाते. आता त्यांना भक्कम राजकीय आधाराची आवश्यकता आहे. त्यामुळे ते पुन्हा मनसेमध्ये प्रवेश करु शकतात.

पहिल्यांदा मनसे सोडताना जाधव काय म्हणाले होते?
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत मान मिळत नाही. राजकीय विरोधकांना आघाडीच्या नावाखाली पाठबळ दिले जाते, अशी कारणे पुढे करीत त्यांनी मनसेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. जाधव यांनी याआधी दोन वेळा पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, त्यावेळी राज ठाकरे आणि यांच्या पत्नी शर्मिला ठाकरेंच्या आश्वासनामुळे त्यांनी पक्षात थांबण्याचा निर्णय घेतला होता. राजीनामा देण्यापूर्वी त्यांनी राज ठाकरे यांची भेटही घेणंही टाळलं होतं. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत घुसमट होत आहे. वेगवेगळया निर्णयांसाठी दबाव आणला जातो, असं जाधव पहिल्यांदा मनसे सोडताना म्हणाले होते.