लष्करात मुलांना नोकरी लावण्याच्या बहाण्याने एकाच कुटुंबातील चौघांच्या खुनाचा प्रकार उघडकीस आला आहे. आरोपीने डोंगराळ व दुर्गम मार्ली घाटात (ता. जावळी, जि. सातारा) मृतदेह फेकून दिले. या प्रकरणी एका पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याने खुनाची कबुली दिली आहे. खून झालेले कुटुंबीय दत्तनगर, बामणोली ता. मिरज, जि. सांगली येथील रहिवासी आहेत. घटनेच्या नेमक्या कारणाचा पोलीस शोध घेत असले तरी पैशाच्या हव्यासापोटीच नराधमाने हे कृत्य केले असल्याचा पोलिसांना संशय आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, तानाजी विठोबा जाधव (वय ५५), पत्नी मंदाकिनी जाधव (वय ५०), मोठा मुलगा तुषार जाधव (वय २६) व छोटा मुलगा विशाल जाधव (वय २०) अशी खून झालेल्या चौघांची नावे आहेत. हे सर्वजण दत्तनगर, बामणोली, ता. मिरज, जि. सांगली येथील राहणारे आहेत. खून प्रकरणी योगेश निकम (रा. सोमर्डी, ता. जावळी) या आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

जावळी तालुक्यातील मार्ली घाटात मृतावस्थेत टाकलेल्या पती-पत्नीचे मृतदेह सोमवारी आढळून आले होते. मेढा व सातारा पोलिसांच्या तपासादरम्यान एकाच कुटुंबातील चार जणांची हत्या झाल्याची बाब समोर आली. या प्रकरणात दाम्पत्यासह त्यांच्या दोन मुलांचाही खून झाल्याचे सोमवारी उघड झाले. दाम्पत्यानंतर एका मुलाचाही याच घाटात मृतदेह सापडला असून दुसर्‍या मुलाचा शोध घेण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. आज सकाळी पुन्हा शोध मोहीम राबविण्यात येत आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी योगेश निकमने (सोमर्डी, ता. जावळी) या व्यक्तीला ताब्यात घेतले त्यानंतर चौकशीदरम्यान त्यानं खुनाची कबुली दिली.

तुषार व विशाल तानाजी जाधव (दत्तनगर, बामणोली, ता. मिरज, जि. सांगली) या मुलांना लष्करात नोकरी लावतो असे आरोपी योगेश निकमने सांगितले होते. त्यानुसार या मुलांना त्याने साताऱ्याला बोलावून घेतले. तिथून त्यांना मार्ली घाटात लष्कराचे ट्रेनिंग सेंटर असून तेथे आपल्याला जायचे आहे असे सांगून नेले. तेथे नेल्यानंतर या दोघांना गुंगीचे औषध देवून उंच कड्यावरुन ढकलून दिल्याची कबुली आरोपीने पोलिसांना दिली. आरोपीने दोन्ही मुलांना संपवल्यानंतर या मुलांच्याच मोबाईलवरुन त्यांच्या आई वडिलांशी संपर्क साधला व त्यांनाही मुलांचे ट्रेनिंग सेंटर पाहण्यासाठी सातार्‍याला बोलावून घेतले. तेथून त्यांना मार्ली घाटात नेवून गुंगीचे औषध देत त्यांचाही या आरोपीने खून केला, अशी प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली.