धुळे : जिल्ह्यासह शहरात दररोज करोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. दोन दिवसात त्यातील चार रुग्णांचा मृत्यू झाला असून यातील एक जण शहरातील लोकप्रतिनिधींचा भाऊ  आहे. त्याचा नाशिक येथील एका खासगी रुग्णालयात मृत्यू झाला. यामुळे जिल्ह्यातील मृतांची संख्या ६२ झाली असून जिल्ह्यात रुग्णांची संख्या ११६१ झाली आहे.

आठ दिवसांची आकडेवारी बघता दररोजच्या अहवालांमध्ये अनेकांचे चाचणी अहवाल सकारात्मक येत आहेत. त्यात धुळे शहरातील सर्वाधिक रुग्ण आढळून येत आहेत. आतापर्यंत मयत झालेल्यांमध्ये शहरातील ३०, तर ग्रामीणमधील ३२ रुग्णांचा समावेश आहे.

गुरूवारी ३४ रुग्ण कोरानामुक्त झाल्याने रुग्णालयातून घरी सोडण्यात आले.

जिल्ह्यात आतापर्यंत ७१२ जण करोनामुक्त झाले आहेत. धुळे येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील कोविड तपासणी प्रयोगशाळेतील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनाही करोनाची लागण झाल्याने कोविड तपासणी अहवाल प्राप्त होण्यात अडचणी निर्माण झाल्या आहेत.

दरम्यान, करोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रमुख अधिकारी म्हणून नियुक्ती झालेले डॉ. आर. व्ही. पाटील यांनी जबाबदारी पार पाडण्यात कसूर केल्याने त्यांच्या विरोधात तहसीलदार प्रवीण चव्हाणके यांनी साक्री पोलिसात तक्रार दाखल केली आहे. साक्री शहरासह तालुक्यात करोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने बाधित रुग्णांच्या उपचारासाठी आणि त्यांच्या संपर्कात असलेल्या व्यक्तींचा शोध घेण्यासाठी प्रमुख अधिकारी म्हणून जिल्हा साथरोग नियंत्रण अधिकारी डॉ. पाटील यांची नेमणूक करण्यात आली होती. त्यांनी तालुका आरोग्य अधिकाऱ्यांशी समन्वय साधून काम करावयाचे होते.

त्यांनी करोना रुग्ण आढळून आल्यानंतर प्रतिबंधित क्षेत्रासाठी योजना तयार करणे, बाधित रुग्णांच्या अति जोखमीच्या संपर्कात असलेल्या व्यक्तींचे संबंध तपासणे आवश्यक होते. परंतु याबाबत कोणतीही कार्यवाही झालेली दिसून येत नाही. ते तहसील कार्यालयात झालेल्या तालुकास्तरीय आपत्ती व्यवस्थापनाच्या बैठकीलाही आले नाही, असे तक्रारीत नमूद आहे.