’ जिल्हय़ातील करोनाबाधितांची संख्या १३ वर * पहिल्या करोनाग्रस्ताच्या आले संपर्कात

अकोला : शहरातील एकाच कुटुंबातील चार जणांचा करोना तपासणी अहवाल शुक्रवारी सकारात्मक आला आहे. जिल्हय़ातील पहिल्या करोनाग्रस्त रुग्णाच्या ते संपर्कात आले होते. जिल्हय़ातील करोनाबाधितांची संख्या आता १३ झाली आहे. जिल्हय़ात करोनाबाधितांचा आकडा सातत्याने वाढत असल्याने समूह संक्रमणाचा धोका वाढला आहे.

अकोला जिल्हय़ात गत चार दिवसांपासून सलग करोनाबाधित रुग्ण आढळून येत आहेत. शहरातील बैदपुरा भागातील रहिवासी असलेला जिल्हय़ातील पहिला करोनाबाधित रुग्ण आढळून आला होता. या रुग्णाच्या संपर्कात असलेल्या चार जणांचे अहवाल आज शुक्रवारी सकारात्मक आल्याने त्यांना करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. यामध्ये दोन लहान मुले, एक पुरुष व एका महिलेचा समावेश आहे. त्यांच्यावर सर्वोपचार रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आता जिल्हय़ातील करोनाबाधितांची संख्या १३ झाली आहे. यात अकोला शहरातील सहा व पातूर येथील सात रुग्णांचा समावेश आहे. शहरातील रुग्ण आढळून आलेला परिसर प्रशासनाने सील केला असून, या भागांना जोडणारे सर्व रस्ते बंद करण्यात आले आहेत. या भागांमध्ये आरोग्य तपासणी करण्यात येत आहे. पातूर व शिर्ला ग्रामपंचायत परिसर सील करण्यात आला आहे. त्याठिकाणी ४० पथकांच्या माध्यमातून घरोघरी आरोग्य तपासणी करण्यात येत आहे.

पातूरमधील सात करोनाबाधितांच्या कुटुंबीयातील ३१ जणांना सर्वोपचार रुग्णालयात तपासणीसाठी दाखल करण्यात आले आहे. त्यांचेही नमुने घेऊन ते पाठवण्यात आले आहेत.

६१ नमुन्यांचे अहवाल प्रलंबित

आतापर्यंत सर्वोपचार रुग्णालयातील विलगीकरण कक्षात दाखल १८१ जणांचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले. त्यामध्ये आजपर्यंत १२० अहवाल प्राप्त झाले असून, त्यामध्ये १०७ नकारात्मक, तर १३ रुग्णांचे अहवाल सकारात्मक आले आहेत. आज पाठवलेल्या ३५ नमुन्यांसह एकूण ६१ नमुन्यांचे अहवाल अद्याप प्रलंबित आहेत.