लग्न सोहळ्यातील बनवाबनवीचे प्रकार अद्यापही संपलेले नाही. बनावट नवरी उभी करुन लग्न लावून लाखो रुपयांना गंडा घालणारे रॅकेट अनेक भागात कार्यरत आहे. शहरातील एका व्यापारी तरुणाची अशाचप्रकारे खोटे लग्न लावून तब्बल पावणेचार लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणी चौघाविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

शहरातील बेलापूर रस्त्यावर आशीर्वादनगरमध्ये राहणाऱ्या सुमित कैलास पांडे (वय ३४) याची फसवणूक केल्याप्रकरणी राहुल रजपूत उर्फ कल्याण फकीरराव राऊत, निता (रा.पुंडलिकनगर, औरंगाबाद) व मेधा संजय कटारिया, अश्विनी कांबळे यांच्याविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट या प्रकरणी तपास करत आहेत.

जैन समाजात मुलींचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे विवाहासाठी तरुण वधू—वर सूचक मंडळे किंवा लग्न जमविणाऱ्या दलालांशी संपर्क केला जातो. शहरातील व्यापारी सुमित पांडे यांची भेट औरंगाबाद येथील लग्न जमविणाऱ्या राहुल रजपूत उर्फ कल्याण राऊत याच्याबरोबर चार महिन्यापूर्वी भेट झाली. जैन समाजातील एका मुलीचे लहानपणीच आई—वडील वारले आहेत. तिचा सांभाळ काकांनी केला आहे. तिचे लग्न करावयाचे आहे, असे सांगितले. त्यानंतर या रॅकेटमधील एकाने पांडे यांच्याशी बोलणे केले. नंतर दि. १९ जानेवारी रोजी मुलीसह चौघे शहरात आले. त्यांनी पांडे यांच्याशी व नातेवाईकांशी बोलणी केली. त्याच दिवशी केशव गोविंद बनात साध्या पद्धतीने लग्न लावण्यात आले. दलालांनी सव्वादोन लाखांची रक्कम घेतली. तसेच नवरीच्या अंगावर सोन्या—चांदीचे दागिणे घालण्यात आले होते. लग्न लागल्यानंतर नवरीला घेऊन ते औरंगाबादला गेले. नंतर नवरी नांदण्यासाठीच आली नाही. पांडे यांनी संपर्क करुनही उपयोग झाला नाही.

पांडे हे नातेवाईकांसह औरंगाबाद शहरातील रांजणगाव औद्योगिक वसाहत परिसरात लग्न जमविणाऱ्या दलालांच्या घरी गेले असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. नवरीच्या मैत्रिणीची आई वारली. असा बहाणा केला. नंतर मात्र त्यांनी तुमचे लग्न झालेच नाही, असा पवित्रा घेतला. लग्न बनविणाऱ्या या रॅकेटने पांडे यांना सुमारे पावणेचार लाख रुपयांना गंडा घातला. अखेर शहर पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

पोलीस अधिक तपास करीत आहेत. रॅकेटमधील आरोपींची नावे ही बनावट आहेत. तसेच नवरीदेखील बनावट आहे, असे प्राथमिक चौकशीत निष्पन्न झाले आहे.