परळी मतदारसंघातील नागरिकांची घरोघरी जाऊन करोनाच्या मोफत थर्मल चाचणीला सुरुवात करण्यात आली आहे. सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या पुढाकारातून हे काम हाती घेण्यात आलं आहे. धनंजय मुंडे यांनी स्वत:सह कुटुंबीयांची यावेळी तपासणी करून घेतली. पहिल्याच दिवसी शहरातील जवळपास दहा हजार नागरिकांची तपासणी करण्यात आली असून आठ दिवसांत एक लाख नागरिकांची तपासणी होणार आहे. मुंबईतील वरळी नंतर राज्यात पहिल्यांदाच परळी मतदारसंघात घरोघरी तपासणी सुरू करण्यात आली आहे. यामुळे नागरिकांच्या मनातील करोनाबद्दलची भीती कमी होईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.

बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी परळी मतदारसंघात करोनाच्या खबरदारीचा उपाय आणि नागरिकांच्या मनातील भीती दूर व्हावी यासाठी नाथ प्रतिष्ठान व मुंबईतील ‘वन रुपी क्लिनिक’ मार्फत घरोघरी जाऊन चाचण्या करण्याचा निर्णय घेतला. शनिवारी दि.१८ एप्रिल रोजी मंत्री मुंडे यांनी स्वतः कुटुंबीय व कर्मचाऱ्यांची तपासणी करून याची सुरुवात केली.

मुंबईतील वन रुपी क्लिनिक चे संचालक डॉ. राहुल घुले यांच्या नेतृत्वात दहा डॉक्टर्सची टीम वरळी नंतर राज्यात पहिल्यांदाच परळी येथे आली. दिवसभरात पद्मावती वसाहतीतील १० हजार नागरिकांची तपासणी झाली केली. तर आठ दिवसात एक लाख नागरिकांची तपासणी करण्यात येणार असल्याचे डॉ. घुले सांगितले. परळी मतदारसंघातील नागरिकांची घरोघरी जाऊन तपासणी करण्यासाठी नाथ प्रतिष्ठानचे कार्यकर्ते आणि मुंबईतून आलेले डॉक्टरांचे पथक काम करत आहे. या तपासणीमुळे करोनाबाबत निर्माण झालेली भीती कमी होईल आणि नागरिकांमध्ये विश्वास निर्माण होईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे. “महाराष्ट्रात करोनामुळे प्रत्येकाच्या मनात भीती निर्माण झाली आहे. मुंबईतील वरळी परिसरात पहिल्यांदा घरोघरी जाऊन तपासणी करण्यात आली. त्यानंतर परळी येथे ही तपासणी होत आहे, असे मुंडे यांनी सांगितले.