महाड येथील चवदार तळे सुशोभीकरण करण्यासाठी तसेच महाड येथे येणाऱ्या अनुयायांसाठी आवश्यक त्या सोयीसुविधा उपलब्ध करून देता याव्यात यासाठी महाड नगर परिषदेला आवश्यक असलेला निधी उपलब्ध करून देण्यात येईल असे सामाजिक न्याय व विशेष साहाय्यमंत्री राजकुमार बडोले यांनी आज महाड येथे सांगितले.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५वे जयंती वर्ष व ८९वा चवदार तळे सत्याग्रह वर्धापन दिन, राष्ट्रीय मानव अधिकार दिनानिमित्त सामजिक न्याय विशेष साहाय्य विभाग आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) यांच्या वतीने महाड येथील राष्ट्रीय स्मारक येथे आयोजित मानव मुक्ती संग्राम अभिवादन सभेत सामाजिक न्यायमंत्री बोलत होते. या कार्यक्रमास आमदार प्रशांत ठाकूर, आमदार मििलद माने, महाडचे नगराध्यक्ष सुनील कविस्कर, श्रीमती बडोले, आदी मान्यवर उपस्थित होते. सामाजिक न्यायमंत्री म्हणाले की, महाडची ही भूमी पवित्र आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी महाडचा सत्याग्रह करून, सामाजिक चळवळ करून समतेचा संदेश दिला आहे. म्हणून या भूमीला विशेष महत्त्व आहे. मागासवर्गीयांच्या सर्वागीण विकासासाठी शासन कटिबद्ध असून या वर्षांच्या बजेटमध्ये १७० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यामधून अनेक कल्याणकारी योजना राबविण्यात येणार आहेत. जसे डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना, कर्मवीर दादासाहेब गायकवाड स्वाभिमान व सबलीकरण योजनेसाठी अनुदान देण्यात येणार आहे. दलित समाजातून उद्योजक निर्माण होण्यासाठी राज्यातील एम.आय.डी.सी. क्षेत्रात २० टक्के  जागा राखीव ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच अधिक सोयीसवलती देऊन उद्योजक निर्माण करण्याचे नियोजन आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारक येथे बार्टीमार्फत सुरू करण्यात आलेल्या प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन केले आहे. या प्रशिक्षण केंद्रातून विद्यार्थ्यांना एम.पी.एस.सी., यू.पी.एस.सी. तसेच इतर स्पर्धा परीक्षांसाठी निवासी प्रशिक्षण सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असून याद्वारे अनेक विद्यार्थ्यांना त्यांचे करिअर घडविण्यासाठी उपयोग होईल असे सांगून श्री. बडोले पुढे म्हणाले की, राज्य सरकारने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे लंडन येथे वास्तव्य असलेले घर खरेदी केले आहे. तेथे उचित स्मारक करण्यात येईल. तसेच इंदू मिल येथील जागेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे राष्ट्रीय स्मारक सर्वाच्या सहमतीने करण्यात येईल. या वेळी आमदार प्रशांत ठाकूर म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५व्या जयंती वर्षांनिमित्त राज्य शासनाने विविध योजना हाती घेतल्या आहेत. लंडन येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे वास्तव्य असलेले घर खरेदी करून शासनाने तेथे अभ्यासासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना सुविधा मिळणार आहेत यामधून त्यांना सामाजिक समतेची प्रेरणा मिळेल. महाड येथे मानव मुक्त संग्रामाच्या निमित्ताने अनेक अनुयायी येत असतात. येणाऱ्या अनुयायांची संख्या विचारात घेता त्यांना सुविधा निर्माण करण्यासाठी महाड नगर परिषदेला शासनाने अधिकचा निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी नगराध्यक्ष सुनिल कविस्कर यांनी केली. या अभिवादन सभेच्या वेळी सामाजिक कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सत्कार मंत्री महोदयांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक बार्टीचे महासंचालक दिनेश िडगळे यांनी केले तर आभारप्रदर्शन साहाय्यक आयुक्त समाज कल्याण प्रसाद खैरनार यांनी केले. सामाजिक न्यायमंत्री श्री. बडोले यांनी अभिवादन सभेच्या पूर्वी चवदार तळे येथे आणि क्रांतिस्तंभ येथे पुष्पचक्र अर्पण करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासही पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले.