एकाची जन्मभूमी, तर दुसऱ्याची कर्मभूमी अशा दोन कलाकारांचा अंतिम प्रवासदेखील पुण्यामध्येच झाला. आनंद अभ्यंकर आणि अक्षय पेंडसे यांच्या पार्थिवावर वैकुंठ स्मशानभूमीत दुपारी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. नाटय़-चित्रपट आणि दूरदर्शन मालिकांमधील कलाकार या प्रसंगी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर रविवारी मध्यरात्री झालेल्या अपघातामध्ये आनंद अभ्यंकर आणि अक्षय पेंडसे या प्रसिद्ध कलाकारांसह अक्षय पेंडसे यांचा मुलगा प्रत्युष (वय दोन वर्ष)याचाही चटका लाऊन जाणारा मृत्यू झाला. या दोघांच्याही कारकिर्दीच्या जडणघडणीचे पुणेकर साक्षीदार असल्यामुळे नाटक, चित्रपट आणि दूरदर्शन मालिकांमध्ये काम करणाऱ्या प्रत्येकालाच अतीव दु:ख झाले होते. वैकुंठ स्मशानभूमी येथे दुपारी या दोघांच्याही पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले, त्या वेळी अनेकांना आपल्या भावना आवरणे शक्य झाले नाही आणि या दोघांसमवेत काम करणाऱ्या कलाकारांनी अश्रूंना मोकळी वाट करून दिली. बारामती येथील नाटय़संमेलनानंतर दोन कलाकारांची ही अचानक ‘एक्झिट’ चटका लावून गेली.
वैकुंठ स्मशानभूमी येथे सकाळी साडेअकरा वाजल्यापासूनच आनंद अभ्यंकर आणि अक्षय पेंडसे यांच्यासमवेत काम करणारे कलाकार आणि चाहत्यांची गर्दी झाली. शोकाकुल वातावरणात या दोघांच्याही पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. नाटय़संमेलनाध्यक्ष डॉ. मोहन आगाशे, ज्येष्ठ अभिनेत्री लालन सारंग, अभिनेते नाना पाटेकर, राघवेंद्र कडकोळ, नाटककार सतीश आळेकर, शफाअत खान यांच्यासह डॉ. गिरीश ओक, स्वप्नील जोशी, अंकुश चौधरी, अविनाश नारकर, हर्षदा खानविलकर, भार्गवी चिरमुले, ऐश्वर्या नारकर, मुक्ता बर्वे, सुबोध भावे, जितेंद्र जोशी, आसावरी जोशी, स्मिता शेवाळे, पुष्कर श्रोत्री, उदय सबनीस, मृण्मयी देशपांडे, प्रसाद ओक,उमेश कामत, लोकेश गुप्ते, सुशांत शेलार, पुष्कर जोग, श्रीरंग गोडबोले, शरद पोंक्षे, ऋजुता देशमुख, मंजूषा गोडसे, अशोक शिंदे हे रंगभूमी आणि चित्रपट क्षेत्रातील कलाकार उपस्थित होते.
श्याम देशपांडे, गोपाळ तिवारी, संदीप खर्डेकर, सुधीर गाडगीळ, सुनील महाजन, मोहन कुलकर्णी, शिरीष रायरीकर, भरत नाटय़ मंदिरातील कर्मचारी यांनी या दोन कलाकारांना श्रद्धांजली अर्पण केली.