‘गणपती बाप्पा मोरया.. पुढच्या वर्षी लवकर याह्णचा जयघोष करत विघ्नहर्त्यां गणरायाला हजारो भक्तांच्या साक्षीने भावपूर्ण निरोप देण्यात आला. शहरातील रामाळा तलावात व इरई नदीत श्री च्या मूर्तीचे विसर्जनानंतर आज गणेशोत्सवाची शांततेत सांगता झाली. विसर्जन मिरवणुकीत विविध समस्यांवर चित्ररूपी देखाव्यांच्या माध्यमातून परखड टीका करण्यात आली.
शहरात काल, शनिवारपासूनच घरगुती व छोटे गणेश मंडळे, तर आज शहरातील प्रमुख सार्वजनिक गणेश मंडळांनी ढोलताशांच्या निनादात मिरवणूक काढून गणरायाला अखेरचा निरोप दिला. सकाळी दहा वाजतापासूनच येथे श्रीच्या विसर्जनाला सुरूवात झाली. बारा वाजेपर्यंत शहरातील गांधी चौकात गणेश मंडळांची रांग लागली होती. शहराच्या विविध भागातून गांधी चौकात एकत्र आलेल्या सार्वजनिक गणेश मंडळांची मिरवणूक गांधी चौकाला वळसा घालून रामाळा तलावाकडे जात होती. मुख्य मार्गाच्या दुतर्फा जनसागर उसळला होता. बहुतांश गणेश मंडळांचे दुष्काळी परिस्थिती व शेतकऱ्यांच्या आत्महत्याचे देखावे लक्ष वेधून घेत होते. यातून शहरातील समस्यांवरही देखाव्यांच्या माध्यमातून अतिशय परखड टीका करण्यात आली. जटपूरा युवक गणेश मंडळाचा चंद्रपूरचा राजा, रेणूका गणेश मंडळ, बालमित्र गणेश मंडळ, सार्वजनिक बाल गणेश मंडळ, जयहिंद गणेश मंडळ, मराठा सार्वजनिक बाल गणेश मंडळ, सतशील गणेश मंडळांच्या मूर्तीही लोकांचे लक्षवेधक होत्या. यात विघ्नहर्त्यांची विविध रूपे बघायला मिळाली. विठ्ठल मंदिर वार्ड गणेश मंडळाने यावर्षी ५० वष्रे पूर्ण केल्याने अतिशय शिस्तबध्द पध्दतीने मिरवणूक काढली. शेतकऱ्याची आत्महत्या, मुंबई बॉम्बस्फोट, दारूबंदी, वन्यप्राणी बचाव मोहिम, सर्पमित्र आदिंचे देखावे तयार केले होते. या मिरवणुकीत कार्यकर्ते लेझीम नृत्य करत होते. तंटय़ा भिल्ल, वाघ आपल्या धुंदीत नाचत होते, तर गणेशभक्त ढोल, ताशा, टाळ, मृदंग व डीजेच्या ठेक्यावर थिरकत होते.
पठाणपुरा व्यायाम शाळा, हिवरणूपी गणेश मंडळ, टागोर गणेश मंडळ, गंजवार्ड गणेश मंडळाचे देखावे आकर्षक होते. लोकमान्य टिळक विद्यालयासमोर भाजपच्या वतीने अर्थमंत्री व पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, केंद्रीय मंत्री हंसराज अहीर, महापौर राखी कंचर्लावार, तर जटपुरा गेट येथे जिल्हा शांतता समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी डॉ. दिपक म्हैसेकर, पोलीस अधीक्षक संदीप दिवाण व शिवसेनेच्या वतीने किशोर जोरगेवार, जिल्हाध्यक्ष सतीश भिवगडे गणेश मंडळाचे स्वागत करत होते. गांधी चौकात माजी खासदार नरेश पुगलिया, युवा नेता राहुल पुगलिया व मित्रमंडळांच्या वतीने गणेश भक्तांना मसाला भात व बुंदीचे वितरण करण्यात आले. जगनगुरू व्यायाम शाळेच्या वतीने पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती, तसेच चंद्रपूर व्यापारी मंडळ, श्रीराम मार्केट शहरातील सामाजिक संघटनांच्या वतीने गणेशभक्तांसाठी शरबत, पाणी, केळी, चिवडा, पोहे, मसालाभात, चना चिवडा, बुंदी, पुरीभाजीचे स्टॉल लावले होते.