राज्यातील अनेक महानगरपालिका व नगरपालिकात कचरा व्यवस्थापनाच्या प्रश्नावरून हाणामारीचे प्रसंग उद्भवत असतानाच गेल्या पाच महिन्यांत लातूर महापालिकेचे कचरा व्यवस्थापनात राज्यातील सर्व महानगरपालिका आणि नगरपालिकांमध्ये पुढे आदर्श निर्माण केला आहे.

जनआधार सेवाभावी संस्थेला शहरातील कचरा व्यवस्थापनाचे काम १२ ऑगस्ट २०१७ रोजी देण्यात आले. १ ऑक्टोबर २०१७ ला प्रत्यक्ष कामाची सुरुवात झाली अन् अवघ्या पाच महिन्यांत आमूलाग्र बदल स्वच्छतेच्या बाबतीत झाले आहेत. ओला व सुका कचरा वेगळा करून देण्यात ७० टक्के लोकांनी सहभाग दिला असून हे एक मोठे आश्चर्य मानले जात आहे.

axis mutual fund, axis multicap fund
अशी होते म्युचुअल फंडाची ‘अल्फा’निर्मिती
panvel marathi news, panvel dispute marathi news
पनवेल : शौचालयाला पाणी मागितल्याने गृहनिर्माण संस्थेच्या सचिवाकडून महिलेला शिवीगाळ 
what is nato and its purpose
नाटोची ७५ वर्ष; ही संघटना का स्थापन करण्यात आली? तिला कोणत्या आव्हानांचा सामना करावा लागतोय?
28 kg of on single use plastic seized by nmmc in navi mumbai
नवी मुंबईत २८ किलो एकल वापर प्लास्टिक जप्त, ९० हजार रुपयांचा दंड वसूल

लातूर नगरपालिका असताना व नंतर महापालिका झाल्यावरही कचऱ्याचाा प्रश्न सुटण्याची सुतराम शक्यता वाटत नव्हती. शहरालगतच्या वरवंटी कचरा डेपोवर कचऱ्याचा मोठा ढीग होता. कचऱ्यापासून खतनिर्मिती करण्यासाठी २००६ मध्ये तीन कोटी रुपये खर्च करून घेतलेली यंत्रसामग्री कुजत पडली होती. जनाधारला काम देण्यापूर्वी शहरातील ५० टक्के कचराही उचलला जात नव्हता. उचलला गेलेला कचरा वरवंटी डेपोवर टाकू नये यासाठी तेथील नागरिक आंदोलनाच्या पवित्र्यात होते. महापालिकेने जनाआधारशी करार करताना कचरा उचलण्यासाठी ९० अ‍ॅपे, २५ ट्रॅक्टर व ४०० मजूर नेमावेत, असे निश्चित झाले होते.

संस्थेचे अध्यक्ष संजय कांबळे यांनी काम सुरू करण्यापूर्वी शहरातील सर्व भागाचा सव्‍‌र्हे केला. शहराचे दहा भाग करून प्रत्येक भागाला १० अ‍ॅपे, तीन ट्रक्टर व ४०कामगार, त्यांनी १० हजार घराचा कचरा गोळा करायचा असे सूत्र ठरवले. पूर्वी काम करण्याचा अनुभव असलेले ४० टक्के तर ६० टक्के कामगार घेण्यात आले. शहरातील मांगगारुडी, कुष्ठरोगी वसाहत, बौद्धनगर, आदी भागातील कामगार यासाठी काम करतात. कचऱ्याच्या कामावर देखरेख करणारे दोन कायद्याचे पदवीधर, दोन अभियांत्रिकी पदविका प्राप्त केलेले विद्यार्थी आहेत. सर्व कामगारांना हातमोजे, गमबूट, अ‍ॅप्रन, रिफ्लेक्टर असे साहित्य देण्यात आले आहे. शहराच्या अंतर्गत भागातील कचरा गोळा करण्याबरोबरच शहराच्या मुख्य रस्त्यावरील साफसफाईसाठी सुमारे १०० महिला कार्यरत असून त्यांचे २० गट काम करतात. काही भागात सकाळी ६ ते ९ या वेळेत काम केले जाते तर काही व्यापारी पेठेत रात्री नऊ ते मध्यरात्री एकपर्यंत काम केले जाते. लातूरच्या इतिहासात पहिल्यांदाच शहराचे मुख्य रस्ते सातत्याने साफ केले जात आहेत.

गल्लीबोळातील कचरा घरोघरी जाऊन गोळा करण्याची यंत्रणा उभी करण्यात आली आणि लोकांना सुरुवातीपासूनच ओला व सुका कचरा वेगळा द्यावा असे आवाहन केले जाऊ लागले. प्रारंभी कचरा उचलण्यासाठी नियमित गाडी येते याचा विश्वास लोकात निर्माण केला गेला. त्यानंतर ओला व सुका कचरा वेगळा देण्याचे आवाहन करण्यात आले. शहरातील स्वयंसिद्धा महिला मंडळाच्या मदतीने ११० महिला ‘स्वच्छताताई’चे काम करतात. संपूर्ण देशात हा पहिला प्रयोग आहे. प्रत्येक अ‍ॅपेच्या मागे एक स्वच्छताताई पत्रके घेऊन घरोघरी जाते. लोकांना ओला व सुका कचरा वेगळा करून देण्याचे महत्त्व पटवते. ऑक्टोबरपासून सुरू झालेल्या या मोहिमेला मार्च महिन्यात ७० टक्के यश प्राप्त झाले आहे व लोक स्वत:हून कचऱ्र्याचे वर्गीकरण करून कचरा देत आहेत. केंद्राच्या टीमने लातुरात राबवलेली ही कल्पना सर्वोत्कृष्ट असल्याचे म्हटले आहे. कचरा व्यवस्थापन पाहण्यासाठी औरंगाबाद, नांदेड, परभणी, चिपळून, मालवण, वेंगुर्ला या ठिकाणावरून लोक येऊन गेले. स्वच्छताताईंनी कचरा गोळा करताना सुक्या कचऱ्याचे प्रमाण वाढवले तर त्यानुसार त्यांना अधिकचे पसे दिले जातात. या काम करणाऱ्या महिला पूर्वी गल्लीबोळात कचरावेचक म्हणून काम करत होत्या. त्यांना सन्मानाने चांगले काम करण्याची संधी यानिमित्ताने मिळाली. लातूर मनपाने यातील काही महिलांना ब्रॅण्ड अँबेसडर म्हणून नियुक्त केले आहे. शहरातील दररोज सुमारे १०० टनांपेक्षा अधिक कचरा गोळा केला जातो. वरवंटी कचरा डेपोवर बंद पडलेली यंत्रसामुग्री दुरुस्त करून ५ ऑक्टोबरपासून तेथे खतनिर्मितीचे काम सुरू आहे. दरमहा सुमारे तीन हजार टन कचऱ्यावर प्रक्रिया केली जाते. या कचरा डेपोवर सुमारे सहा लाख टन इतका जुना कचरा आहे. नव्याने येणारा कचरा डेपोवर न टाकता त्यापासून खतनिर्मिती होते आहे. या खताची तपासणी करून घेऊन आजूबाजूच्या शेतकऱ्यांना तो मोफत वितरित करण्यात आला. आता शेतकऱ्यांना याची खात्री पटत असून ते विकत घेऊन जात आहेत. खताचे महत्त्व पटवण्यासाठी आजूबाजूच्या गावांत खताचे नमुने देऊन लोकांना या खताचे महत्त्व पटवून देण्याचे कामही सुरू आहे.

कचऱ्याचे विकेंद्रित व्यवस्थापन करून कचरा डेपोवर कचरा जाणारच नाही या पद्धतीचे नियोजन जनाधार संस्थेचे अध्यक्ष संजय कांबळे करत आहेत. काही घरांमध्ये शून्य कचरा ही संकल्पना रुजवली जात असून घरातल्या घरातच कचऱ्याची विल्हेवाट लावली जात आहे. अशा घरांची संख्या वाढवण्याच प्रयत्न आहे. रस्त्यावर कचऱ्याचे ढीग पडल्याचे दृश्य पूर्वी होते आता असे चित्र नाही. उलट रस्त्यावर कचरा टाकणाऱ्या नागरिकांना त्या भागातील मंडळीच प्रतिबंध करत आहेत. कचऱ्याचे व्यवस्थापन नीट नसल्यामुळे नगरसेवकांना आपल्या प्रभागात फिरणे अवघड होते. आता कचऱ्याचे व्यवस्थापन चांगले झाल्यामुळे नगरसेवकांना मोकळा श्वास घेता येऊ लागला आहे.

स्वच्छतेत पहिल्या ५० शहरांत समावेश

पाच महिन्यांपूर्वी स्वच्छतेच्या बाबतीत लातूर शहराचा क्रमांक देशात ३१८वा होता. आता तो पहिल्या पन्नासात आहे. आगामी काळात कचऱ्यापासून बायोगॅसची निर्मिती करून सीएनजी गॅस उपलब्ध करणे, चीन, घाणा, इंडोनेशिया, आदी देशांत कचऱ्याचा वापर पशुखाद्यासाठी केला जातो. त्या दिशेनेही प्रयत्न केले जाणार आहेत. लातूरकरांनी स्वच्छतेसाठी जो प्रतिसाद दिला त्याची तुलना करणे अवघड आहे. ज्या शहराने भीषण पाणीटंचाई अनुभवली त्याच शहराने लोकसहभागातून मांजरा नदीचे खोलीकरण करत जलयुक्त लातूरला साथ दिली. त्याच शहराने कचऱ्याचा वाईट अनुभव घेतला होता. आता लोकसहभागातून कचरामुक्तीच्या दिशेने लातूरकर वाटचाल करत आहेत.