कोल्हापूर : करोना आजाराच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामार्फत विविध स्तरावर उपाययोजना सुरु आहेत. स्मशानभूमी येथील होणारी लोकांची गर्दी कमी करण्यासाठी करोना रुग्णांवर अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमी येथील गॅसदाहिनीचा वापर करण्यात यावा यासाठी महापौर यांनी गॅसदाहिनी सुरु करणेबाबत अधिका-यांना आदेश दिले होते. त्याप्रमाणे आज गॅसदाहिनी सुरु करण्यात आली. आज एका कोरोना बाधित रुग्णाचा मृत्यू झाल्यावर येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यासाठी एक तास अवधी लागला.
महापौर निलोफर आजरेकर यांनी गॅसदाहिनीबाबत मागील आठवडयात बैठक घेऊन लवकर सुरु करण्याचे आदेश दिले होते.

गटनेते शारगंधर देशमुख, नगरसेवक ईश्वर परमार, आशपाक आजरेकर, उप आयुक्त निखील मोरे, आरोग्य निरिक्षक अरविंद कांबळे यांनी शहरातील व शहराबाहेरील टेक्नीशियनला जागेवर बोलवून गॅसदाहिनी कुठे लिकेज आहेत याची तपासणी करून दुरुस्त करुन घेण्यात आली.
पंचगंगा स्मशानभूमीकडे एकूण ४२ बेड उपलब्ध असून त्यापैकी २० बेडचे सिव्हील वर्कचे काम सध्या सुरु आहे. या बेडपैकी ७ बेड हे करोना रुग्ण मयत झालेल्या रुग्णांच्या अंत्यसंस्कारासाठी उपलब्ध केले आहे. गॅसदाहिनीमध्ये लिकेज असल्यामुळे ती सुरु करण्यात आलेली नव्हती. यासाठी बडोदा येथील अल्फा गॅस एजन्सी कंपनीचे टेक्नीशियन कोल्हापूरला आले होते.