करोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे चर्चेत आलेले येथील सामान्य रुग्णालय आता पूर्णपणे नॉन कोविड रुग्णालय झाले आहे. उपचार घेणाऱ्या सर्व संशयित आणि बाधित रुग्णांना अन्य रुग्णालयांमध्ये हलविल्यानंतर मंगळवारी हे रुग्णालय पूर्णपणे बंद ठेवत निर्जंतूक करण्यात आले. त्यानंतर बुधवारपासून हे रुग्णालय पुन्हा सुरू करण्यात आले.

मार्चच्या तिसऱ्या आठवडय़ापासून येथे आढळून येणाऱ्या संशयित आणि करोना बाधित रुग्णांवर अन्यत्र उपचाराची सोय नसल्याने सामान्य रुग्णालयातील विलगीकरण कक्षातच उपचार करण्यात येत आहेत.

आरोग्य मंत्रालयाच्या मार्गदर्शक तत्वानुसार करोना रुग्णांच्या उपचारासाठी स्वतंत्र रुग्णालयाची सोय करणे आवश्यक असल्याने शहरातील तीन खासगी रुग्णालयांमध्ये अशी व्यवस्था निर्माण करण्यात आली. परंतु ही व्यवस्था निर्माण करण्यास बराच उशीर झाला. दरम्यानच्या काळात सामान्य रुग्णालय ‘नॉन कोविड रुग्णालय’ म्हणून घोषित करण्यात आले. परंतु सामान्य रुग्णालयात दाखल असलेले रुग्ण अन्य रुग्णालयांमध्ये उपचारासाठी जाण्यास धजावत नसल्याने प्रत्यक्षात ते नॉन कोविड होऊ  शकले नव्हते. अखेरीस एकेक रुग्ण अन्यत्र हलवत सर्व रुग्णांचे स्थलांतर करण्यात रुग्णालय व्यवस्थापनास सोमवारी यश आले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी संपूर्ण रुग्णालय निर्जंतूक करण्यात आले.

सलग तीन आठवडे उपचार करीत असतांना करोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात आल्यामुळे या रुग्णालयाचे डॉक्टर,परिचारिका आणि अन्य कर्मचाऱ्यांची देखील करोना चाचणी करण्यात आली होती. या सर्वाचा अहवाल नकारात्मक आला असला तरी खबरदारी म्हणून एक आठवडाभर त्यांचे अलगीकरण करण्यात आले होते. आता अलगीकरण झालेले हे डॉक्टर आणि कर्मचारी कामावर परतले आहेत.

सामान्य रुग्णालयात दर दिवशी साधारणत: ७०० रुग्ण उपचारासाठी येत असत. तसेच महिन्याकाठी २०० हून अधिक प्रसुती होत असत. मात्र तेथे करोना रुग्णांची भरती होऊ  लागल्याचे समजल्यावर अन्य आजारांसाठी उपचार घेणाऱ्या रुग्णांनी संसर्गाच्या भीतीने तिकडे जवळपास पाठ फिरवल्याचे चित्र होते. आता हे रुग्णालय नॉन कोविड झाले असून अन्य रुग्णांवर तेथे उपचार सुरू झाल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. योगेश पाटील यांनी दिली.

मालेगावात ‘ऑपरेशन पोलीस सुरक्षा कवच’

मालेगांव शहर परिसरात आरोग्य विभागासह पोलिसांची भूमिका महत्वपूर्ण ठरत आहे. पोलिसांना करोनासह शहरातील सामाजिक परिस्थितीशी लढा द्यावा लागत असल्याने पोलिसांच्या सुरक्षेसाठी येथे ‘ऑपरेशन पोलीस सुरक्षा कवच’ कार्यान्वित करण्यात आले आहे. शहरात सध्या बंदोबस्तासाठी नाशिक ग्रामीण, जळगांव, धुळे, जालना, मरोळ, राज्य राखीव दलाची तुकडी तैनात आहे. बंदोबस्तावरील पोलिसांना करोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी नाशिक ग्रामीण पोलीस दलाने चोख व्यवस्था केली आहे. १२ लॉन्समध्ये पोलिसांची राहण्याची व्यवस्था करण्यात आली असून त्या ठिकाणी सामाजिक अंतरपथ्य पालनासाठी ५० पेक्षा जास्त कर्मचारी नाहीत. आठवडय़ातून दोन वेळा त्यांची वैद्यकीय चाचणी करण्यात येत आहे. आरोग्य विषयक अडचणीसाठी डॉक्टरांचे क्रमांक निवास व्यवस्थेच्या ठिकाणी लावण्यात आले आहेत. त्यांना द्राक्ष, टरबूज, काकडी, बिस्कीट, रस, च्यवनप्राश आदी देण्यात येत आहे. थर्मल स्कॅनर आणि पल्स ऑक्सिमीटर देण्यात आल्यामुळे करोना लक्षणांची तपासणी तातडीने करता येत आहे. निवास ठिकाणी वेळोवेळी धुरळणी आणि प्रसाधनगृहाची नियमित स्वच्छता केली जात आहे. पोलिसांसाठी स्वतंत्र मदतवाहिनीही सुरू करण्यात आली आहे.