News Flash

पिण्याचे पाणी जलवाहिन्यांद्वारे देण्याचा निर्णय लवकरच – गिरीश महाजन

शनिवारी भाजपच्या वतीने येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते.

राज्यभरातील अनेक धरणांमधून पाणीपुरवठा योजनांसाठी कालव्याद्वारे पाणी देण्याच्या पद्धतीमुळे मोठय़ा प्रमाणावर पाण्याची नासाडी होत असल्याने ही पद्धत बंद करून आगामी काळात थेट जलवाहिन्यांद्वारे पाणी पुरविण्याचा शासनाचा मानस आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत लवकरच त्या अनुषंगाने निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती जलसंपदामंत्री तथा नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी दिली. शनिवारी भाजपच्या वतीने येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते.
गेल्या शंभर वर्षांत नव्हती इतकी दुष्काळाची दाहकता यंदा जाणवत असल्याचे सांगून महाजन यांनी गेल्या काही वर्षांत कधी पाणीटंचाई तर कधी गारपीट-अवकाळी पाऊस यांसारख्या समस्यांमुळे शेतकरी हवालदिल झाल्याचे मान्य केले. शेतकऱ्यांच्या अडचणींची शासनाला पूर्ण जाण असून त्यामुळेच केंद्र तसेच राज्य सरकारने शेतकरी हा घटक केंद्रबिंदू मानून धोरणे राबविण्यास प्राधान्य दिले आहे. पाणीटंचाईचा मुकाबला करण्यासाठी शासन विविध पातळ्यांवर प्रयत्नशील आहे. पाणी बचतीसाठी ठरावीक पिकांना ठिबक सिंचन पद्धतीची सक्ती करण्याचा शासनाचा विचार असल्याचे त्यांना सांगितले.
भाषणात महाजन यांनी नाशिकचे माजी पालकमंत्री छगन भुजबळ तसेच राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कथित गैरकारभारांचे वाभाडे काढले. वृत्त वाहिन्यांवरील भुजबळांची सध्याची छबी पाहिल्यावर इतके वाईट दिवस कुणावरही येऊ नये असे वाटत असल्याचे सांगत त्यांच्याप्रति काहीशी सहानुभूती दाखविण्याचा प्रयत्न करतानाच संपूर्ण घर तुरुंगात जाण्याची वेळ येईपर्यंत हे लोक गैरमार्गाने इतका पैसा कशासाठी जमा करतात, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. भुजबळांनंतर आता अजित पवार यांचा क्रमांक असल्याचे नमूद करत आघाडी सरकारच्या काळात जलसंपदा खात्यात कल्पना करवत नाही इतका गोंधळ व अनियमितता झाल्याचे सांगत गैरव्यवहार करणाऱ्यांना तुरुंगात जाण्याशिवाय गत्यंतर राहणार नाही असा इशाराही महाजन यांनी दिला. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी धुळ्याचे खासदार डॉ. सुभाष भामरे होते. या वेळी माजी मंत्री डॉ. प्रशांत हिरे, आ. डॉ. अपूर्व हिरे, आ. डॉ. राहुल आहेर, जिल्हा बँकेचे संचालक अद्वय हिरे, ज्येष्ठ नेते सुरेश निकम आदी उपस्थित होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 15, 2016 12:01 am

Web Title: girish mahajan solution on water scarcity
टॅग : Girish Mahajan
Next Stories
1 गडचिरोलीत पोलीस महासंचालकांच्या दौऱ्यादरम्यान नक्षलवाद्यांकडून तिघांची हत्या
2 कसारा घाटात टँकर उलटून वायुगळती; नाशिक-मुंबई महार्गावरील वाहतूक ठप्प
3 शिक्षण विभागाने रिक्त जागांचा तपशील दडवला
Just Now!
X