कृषीपंपांच्या अनेक जोडण्या दिल्या असताना प्रत्यक्षात त्या प्रलंबित दाखविण्यात येत असल्याचे महावितरणने राज्यात प्रातिनिधिक स्वरुपात केलेल्या तपासणीत आढळून आले आहे.
महावितरणच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मागील ५ वर्षांत राज्यभरात कृषीपंपांना १० लाखांपेक्षा अधिक वीज जोडण्या देण्यात आल्या. असे असले, तरी १ लाख ६७ हजार वीज जोडण्या प्रलंबित असल्याचे दिसून येत आहे. महावितरणच्या मुख्यालयातून पथके पाठवून या संदर्भात प्रातिनिधिक स्वरुपात पाहणी करण्यात आली. मुख्यालयातील पथकांनी राज्याच्या विविध भागांतील कृषीपंपांच्या प्रलंबित ४३७ जोडण्यांची तपासणी केली असता यातील ७२ जोडण्या सुरू झाल्या असूनही त्यांना देयकेच देण्यात आली नसल्याचे स्पष्ट झाले.
नांदेड परिमंडळात पाहणी केलेल्या २६ प्रलंबित जोडण्यांपैकी सर्व जोडण्या देण्यात आल्याचे आढळून आले. नाशिक परिमंडळात प्रलंबित २५ जोडण्यांपैकी १५ जोडण्या देण्यात आल्याचे आढळले. नागपूर परिमंडळातही पाहणी केलेल्या प्रलंबित ३२पैकी ३० वीज जोडण्या देण्यात आल्याचे समोर आले. प्रातिनिधिक स्वरुपात तपासण्या झालेल्या कृषीपंपांच्या जोडण्यांपैकी ४५ ते ५० टक्के जोडण्या प्रत्यक्षात देण्यात आल्याचे या पाहणीत समोर आले.
कृषीपंपांच्या अनेक जोडण्या दिलेल्या असताना त्या प्रलंबित दाखविण्यामागील खरे कारण काय, याचा शोध महावितरण घेत असून सर्व प्रलंबित अर्जाची तपासणी करून सत्य स्थिती शोधण्याची प्रक्रिया मुख्यालय पातळीवरून सुरू केली आहे. खोटी आकडेवारी देण्यामागे कंत्राटदारांसोबत संगनमत करण्याचे कारस्थान तर नाही ना, याचाही शोध घेण्याचे काम महावितरणने मुख्यालय पातळीवर सुरू केले असल्याचे अधिकृतरित्या सांगण्यात आले.