दिगंबर शिंदे

येथील आटपाडीच्या यात्रेत  जातिवंत मेंढा ‘बुलेट’ मोटारसायकलपेक्षाही जादा दराने खरेदी झाली. जातिवंत माडग्याळी  मेंढय़ाला आटपाडीच्या उत्तेरश्वर यात्रेत तीन लाखाचा दर मिळाला. जातिवंत मेंढय़ांची पदास करण्यासाठी या मेंढय़ांची खरेदी जाणकार मेंढपाळाकडून करण्यात आली. दोन दिवसाच्या बाजारात यंदा शेळी-मेंढी बाजारात ८० लाखांची उलाढाल झाली.

आटपाडीचे ग्रामदैवत श्री उत्तरेश्वर देवाच्या काíतकी यात्रेनिमित्त दोन दिवसात शेळ्या मेंढय़ांची ८० लाखाची उलाढाल झाली.पश्चिम महाराष्ट्र आणि कर्नाटकात प्रसिद्ध असलेल्या यात्रेस मेंढपाळ व व्यापाऱ्यांनी हजेरी लावली. जातिवंत मेंढय़ासाठी लाखोंची किंमत सांगण्यात आली. परंतु २.५ ते ३ लाखापर्यंत मेंढय़ांना दर मिळाला.

आटपाडी येथील या यात्रेचे गतवैभव हरवले आहे. शेळ्या मेंढय़ांची यात्रा मोठी भरते. माणदेशी जातिवंत खिलार जनावरांच्या यात्रेत गेल्या कांही वर्षांत मोठी जनावरे दाखल होत नाहीत.दुष्काळ आणि नियोजनाचा अभाव त्यास कारणीभूत ठरला आहे.

मंगळवारी यात्रेस सुरुवात झाली. पारंपरिक वाद्य्ो आणि फटाके वाजवून मेंढपाळांनी मिरवणूक काढून यात्रेत जनावरे आणली. मेंढय़ा खांद्यावर घेऊन नाचत उत्साहात आणल्या गेल्या. मंगळवारी ५० ते ५५ तर बुधवारी २५ ते ३० लाख अशी ८० लाखांची उलाढाल झाली, अशी माहिती बाजार समितीचे सचिव शशिकांत जाधव यांनी दिली.

मंगळवारी आणि बुधवारी यात्रेत ७ ते ८ हजार शेळ्या मेंढय़ांची आवक झाली. मेंढय़ांची आवक जादा तर शेळ्या बोकडांची आवक कमी होती. थोडय़ा प्रमाणात घोडय़ांचीही आवक होती.

यात्रेत माडग्याळ प्रजातीच्या जातीवंत बकऱ्यांची अडीच लाखाची किंमत मिळाली. हौशी मेंढपाळांनी मेंढय़ांची किंमत १० ते १५ लाख सांगितली तरी दीड ते अडीच-तीन लाखांवर भाव मिळाला नाही.बुलेट मोटरसायकलच्या दराशी मेंढय़ांच्या दराची तुलना झाली.

यात्रेत समाजकल्याण सभापती ब्रम्हानंद पडळकर, पंचायत समिती सभापती हर्षवर्धन देशमुख, उपसभापती दिलीप खिलारी, सचिव शशिकांत जाधव, धनंजय पाटील यांनी हजेरी लावली.