शनिवारपासून सुरू झालेल्या पूर्वा नक्षत्राने मुक्काम ठोकला असून, जिल्ह्याच्या पश्चिम भागात संततधार, तर दुष्काळी भागात मध्यम पावसाची हजेरी आहे. धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू असल्याने चांदोलीतील पाणीसाठय़ात दोन दिवसांत दोन टीएमसी पाणी वाढले असून, कोयनेत ४ टीएमसी पाणी वाढले आहे. चांदोलीतील पाणीपातळी सांडव्याला लागली आहे.

शनिवारपासून पूर्वा नक्षत्राचा प्रारंभ झाला असून, या नक्षत्राने सोमवारपासून जिल्ह्यात जोरदार पावसाला सुरुवात केली आहे. तत्पूर्वीचे मघा नक्षत्र निम्मे कोरडे गेले होते. मात्र पावसाच्या पुनरागमनाने शेतकरी सुखावला आहे. मंगळवारी दिवसभर सांगली, मिरजेसह जिल्ह्यात संततधार सुरू होती. दुपारी काही काळासाठी विश्रांती घेतलेल्या पावसाने पुन्हा सायंकाळी जोर धरला होता. आज सकाळी चांदोली धरणातील पाणीसाठा २८.४६ टीएमसी झाला असून, क्षमतेच्या ८३ टक्के भरले आहे.

मंगळवारी सकाळी संपलेल्या २४ तासांत जिल्ह्यात सरासरी १३.२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली असल्याचे पाटबंधारे विभागाकडून सांगण्यात आले. गेल्या २४ तासांत सर्वाधिक पावसाची नोंद शिराळा येथे झाली असून, या ठिकाणी २४ तासांत ४५.८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. अन्य तालुक्याच्या ठिकाणी झालेला पाऊस असा मिरज १२.९, जत ३.४, खानापूर-विटा १०.६, वाळवा-इस्लामपूर १०.१, तासगाव ७.३, आटपाडी ३.७, कवठेमहांकाळ ३.६, पलूस १२.५ आणि कडेगाव १५.२ मिलिमीटर.

सोलापुरात पावसाची तुरळक हजेरी

सोलापूर-  जिल्ह्य़ात पुष्य नक्षत्राच्या पावसाने दिलासा दिल्यानंतर मंगळवारी संथगतीने आश्लेषा नक्षत्राला प्रारंभ झाला. पहिल्या दिवशी जिल्ह्य़ात काही भागात तुरळक प्रमाणात पावसाने हजेरी लावली. करमाळा-२.८८ मिमी तर माढा-२.०८ मिमी या भागात पाऊस झाला. पंढरपुरात १.५८, सांगोल्यात १.५०, तर माळशिरसमध्ये ०.८८ अशी पावसाने तुरळक हजेरी लावली. इतर भागात पावसाने दडी मारल्याचे दिसून आले. मंगळवारी दुपारनंतर आकाशात ढगांची गर्दी होती. सायंकाळी शहर व परिसरात काही वेळ पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या.  यंदाच्या पावसाळ्यात मृग, आद्र्रा व पुनर्वसू या तिन्ही नक्षत्रांनी जवळपास निराशाच केली असताना गेल्या १९ जुलैपासून पुष्य नक्षत्राने दिलासा दिला. पुष्य नक्षत्र सुरू होण्यापूर्वी जिल्ह्य़ात केवळ १०३.७३ मिमी इतकाच सरासरी पाऊस पडला होता. त्यानंतर पुष्य नक्षत्राच्या पावसाने दमदार हजेरी लावत मंगळवारी शेवटच्या दिवसापर्यंत सुमारे शंभर मिमी सरासरी पावसाची भर टाकली. त्यामुळे आतापर्यंत २०४.६० मिमी इतका सरासरी पाऊस होऊ शकला. आतापर्यंत पावसाची सरासरी २०९.८१ मिमी एवढी असताना ती गाठण्यास केवळ ५ मिमी सरासरी पावसाची गरज आहे.

 

संततधारेमुळे धरणे भरू लागली

कोयनेत सात टीएमसी पाण्याची मोठी वाढ

वार्ताहर, कराड ; कोयना धरण पाणलोटात काल, सोमवारी रात्रीपासून पावसाचा जोर आणखी वाढल्याने धरणातील पाण्याची आवक तिपटीने वाढली असून, पाणीसाठय़ात जवळपास साडेपाच टीएमसीची घसघशीत वाढ झाली आहे. कोयनेचा जलसाठा ६८ टीएमसी (६६.५० टक्के) असून, दिवसभरात (सकाळी ८ ते संध्या ६ वाजेपर्यंत) धरणक्षेत्रातील कोयनानगरला ७१, नवजाला ५५, महाबळेश्वला १३८ तर प्रतापगडला १६४ मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. कोयनेच्या धरणक्षेत्रात सरासरी ३,०६२ मि. मी. पाऊस कोसळला असून, तो एकूण सरासरीच्या ६१.२४ टक्के आहे.

दरम्यान, पश्चिम महाराष्ट्रात दुसऱ्या दिवशीही संततधार कायम असून, त्यामुळे बळिराजासह सर्वसामान्य जनता सुखावली आहे. जोरदार पावसामुळे जलसाठे गतीने भरू पाहत आहेत. राधानगरी, घटप्रभा, कडवी, गुंजवणी ही धरणे भरली असून, वारणा, कुंभी, कासारी, जांभरे, धोम-बलकवडी, चासकमान, येडगाव हे प्रकल्प भरण्याच्या मार्गावर आहेत. राजापूर येथे कृष्णानदीच्या जलपातळीत वाढ होताना, पाण्याचा विसर्ग दुप्पट म्हणजेच २७,५८० क्युसेक प्रतिसेकंद आहे. आज दिवसभरात कोयनेच्या पाणलोटातील प्रतापगडला सर्वाधिक १६४ मि. मी. तर पाठोपाठ महाबळेश्वरला १३८, मुळशी १०६, नीरा देवघर १०२, धोम बलकवडीला ९४, गुंजवणी ८३, हत्तेघर ७८, मोरणा ७१, महू ६८, वारणा ४३, डिंभे ४१, वरसगाव ३७, पानशेत ३५, दूधगंगा ३२, उत्तरमांड ३०, माणिकडोह २३ तर, भाटघर धरणक्षेत्रात २२ मि. मी. पावसाची नोंद झाली . दुष्काळी पट्टय़ातही पाऊस कोसळल्याने नागेवाडी, महू, हात्तेघर या प्रकल्पाचा पाणीसाठाही वाढला आहे. जलसाठय़ांची सरासरी ७० टक्क्यांहून अधिक अशी असल्याचे दिसून येत आहे. पावसाळय़ाचा उर्वरित कालावधी विचारात घेता, अपवाद वगळता बहुतांश प्रकल्प भरून वाहतील असा अंदाज बांधला जात आहे.

पश्चिम महाराष्ट्रातील धरणांचा पाणीसाठा टीएमसीमध्ये व त्याची कंसात टक्केवारी – कोयना ६८ (६६.५०), वारणा २८.८९(८४), राधानगरी ८.०७ (९६.५३), दूधगंगा १४.७३ (५८), धोम ७.८७ (५८.३१), कण्हेर ७.०६ (७०), धोम-बलकवडी ३.५२(८९), उरमोडी ६.९४ (७३), तारळी ४.२५(७३), उत्तरमांड ०.६० (६९), नागेवाडी ०.१२ (४९), हत्तेघर ०.९२ (३६),वीर ५.४२ (५८), नीरा-देवघर ७.८३ (६९), भाटघर १५.२३ (६५), पवना ५.६१ (६६), गुंजवणी २.१३ (९९), खडकवासला १.२९(६६), पानशेत ६.८० (७४), वरसगाव ७.६२ (६०), टेमघर १.८० (४९), मुळशी १४.०८ (७६.२०), माणिकडोह ३.६०(३५.३२), येडगाव २.५३(९१), डिंभे ६.८०(५५), चासकमान ६.१०(८१) तर सोलापूर जिल्ह्यातील उजनी धरणात उणे १५.०३(उणे २८.०६) असा पाणीसाठा आहे.