भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका करताना वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर सातारा जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी पडळकरांचा तीव्र शब्दांत निषेध केला. तसेच पडळकर यांना सातारा जिल्ह्यात येऊ आणि फिरु देणार नाही, असा इशाराही जिल्हाध्यक्ष तेजस शिंदे यांनी दिला आहे.

राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार पडळकर यांचा तीव्र शब्दात निषेध करताना एक निवेदन जाहीर केलं आहे. यामध्ये त्यांनी म्हटलं की, लायकी नसलेल्या माणसाने शरद पवार यांच्यावर टीका करावी हे हास्यास्पद आहे. केवळ प्रसिद्धीसाठी केलेला हा असहाय्य प्रयत्न आहे.

“जो माणूस कालपर्यंत मोदींना, भाजपाला शिव्या देत होता, त्यांच्याकडूनच उमेदवारी घेऊन आमदार होतो. असे अनेक गोपीचंद महाराष्ट्रात झाले आहेत. पवारांच्या उंचीलाही ते स्पर्श करु शकत नाहीत. शरद पवारांवर बोलताना जी भाषा त्यांनी वापरली आहे, त्याचा आम्ही सातारा जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्यावतीने तीव्र निषेध करतो,” असं तेजस शिंदे यांनी म्हटलं आहे.

तसेच त्यांना भविष्यात सातारा जिल्ह्यात फिरकू देणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. त्याचबरोबर गोपीचंद पडळकर यांच्याविरोधात सातारा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचेही शिंदे यांनी सांगितले.