गोसेखुर्द हा महत्त्वाकांक्षी राष्ट्रीय प्रकल्प येत्या तीन वर्षांत पूर्ण करण्यात येईल. त्यासाठी पुरेसा निधी उपलब्ध करून दिला जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी दिली.
वैनगंगा नदीवरील गोसेखुर्द राष्ट्रीय सिंचन प्रकल्पाला मुख्यमंत्र्यांनी भेट दिल्यानंतर आयोजित बैठकीत ते बोलत होते. गोसेखुर्द प्रकल्पाच्या निर्मितीपासून आजपर्यंत झालेले काम, तसेच या प्रकल्पामुळे विकसित होणारी सिंचन क्षमता याबाबतची संपूर्ण माहिती मुख्यमंत्र्यांनी जाणून घेतली. तसेच विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाच्या वाटचालीची माहिती घेतली. तसेच येथील जलविद्युत प्रकल्पाला भेट देऊन पाहणी केली.
हा प्रकल्प पूर्ण करतानाच त्यामुळे बाधित झालेल्या नागरिकांचे योग्य पुनर्वसन व्हावे. तसेच पुनर्वसन पूर्ण झाल्यावर प्रकल्पग्रस्तांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न सोडवण्यासाठी रोजगार निर्मितीचे प्रकल्प सुरू करण्याला प्राधान्य द्यावे, अशा सूचना केल्या आहेत. प्रकल्प पूर्ण करताना पर्यावरणाचा समतोल राखला गेला पाहिजे हा आमचा आग्रह आहे. नाग नदीमुळे येथील पाण्याचे प्रदूषण होणार नाही याची खबरदारी घेणे आवश्यक आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले. नाग नदी प्रदूषणासंदर्भात दीर्घकालीन आराखडा तयार करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
मुख्यमंत्र्यांचा ताफा अडवला
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे गोसेखुर्द प्रकल्पाची पाहणी करण्याकरिता आले असता त्यांचा ताफा अडवून विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
पीक हानिपोटी मदत जाहीर
– मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे पूर्व विदर्भाच्या दौऱ्यावर येण्याच्या एक दिवस आधी म्हणजे ७ जानेवारीला महसूल खात्याने राज्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या पीक हानीसाठी मदतीचा दुसरा व अंतिम हप्ता २,९९२ कोटी रुपये मंजूर करण्याचा आदेश जारी केला. यातून पूर्व विदभातील सहा जिल्ह्य़ांना ११.८७ कोटी रुपये मिळणार आहेत.
– त्यात नागपूर जिल्ह्य़ासाठी १७.८२ लाख, वर्धा जिल्ह्य़ात २४.०३ लाख, भंडारा जिल्ह्य़ासाठी ८ कोटी २९ लाख, गोंदिया जिल्ह्य़ासाठी ६७.४० लाख, चंद्रपूर जिल्ह्य़ासाठी ६२.६९ लाख आणि गडचिरोली जिल्ह्य़ासाठी १ कोटी ८५ लाख रुपयांचा समावेश आहे.
‘उदार’ राजाचे जाहीर आभार
मुख्यमंत्री १४ महिन्यांच्या कार्यकाळात नागपूरचे हिवाळी अधिवेशन वगळता प्रथमच पूर्व विदर्भाच्या दौऱ्यावर आले. येथे येण्यापूर्वी त्यांनी शेतकऱ्यांसाठी मदतीचा अंतिम निर्णय जारी केला. यातून शेतकऱ्यांना ११ कोटी रुपयांची मदत जाहीर केली. ‘उदार’ राजाचे जाहीर आभार. – देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते.