प्रतिकिलो १७ रुपयांचा अबकारी कर ७० रुपयांवर

लंडनमधील साहेबांच्या टेबलावर सांगलीची द्राक्षे पाठवायची असतील तर प्रतिकिलो ७० रुपये अबकारी कर भरावा लागणार असल्याने निर्यातक्षम द्राक्ष उत्पादन अडचणीत आले आहे. गेल्या वर्षांपर्यंत केवळ  १७ रुपयांवर असलेला हा कर या वर्षीपासून ५३ रुपयांनी वाढला आहे.

सांगली-तासगावचा भाग हा द्राक्ष उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. जिल्ह्णात सुमारे दीड लाख एकर क्षेत्रावर द्राक्ष उत्पादन घेतले जाते. यातील मोठे क्षेत्र हे निर्यातक्षम द्राक्ष उत्पादनाचे आहे. या द्राक्षनिर्मितीसाठी वेगळे प्रयोग राबविण्यात येत असल्याने खíचकही आहे. मात्र, परदेशी पाहुण्यांना सांगलीच्या द्राक्षाची वेगळी चव देण्याबरोबरच दोन पसे जादा मिळतात, यामुळे काही जिद्दी शेतकरी निर्यातक्षम द्राक्ष उत्पादन घेतात. विशेषत: विटा, खानापूर, तासगाव तालुक्यांमध्ये निर्यातक्षम द्राक्ष उत्पादन मोठय़ा प्रमाणात घेतले जाते.

यंदा अवेळी झालेल्या पावसामुळे द्राक्षाच्या ३० टक्के बागा रोगाच्या तावडीत सापडल्याने मुळात उत्पादनात घट आली आहे. उर्वरित ७० टक्के बागांमधील ४० टक्के उत्पादन हे बेदाणानिर्मितीसाठी वापरले जाते, तर उर्वरित द्राक्ष उत्पादन हे बाजारपेठेसाठी उपलब्ध आहे. यापकी सोनाका, सुपर सोनाका, माणिक चमन, कृष्णा आदी जातींची द्राक्षेही देशांतर्गत बाजारपेठेसाठी तयार केली जातात. तर थॉमसन, शरद सीडलेस, तास-ए-गणेश, धनाका या जातींची द्राक्षे निर्यात केली जातात.

देशांतर्गत बाजारासाठी प्रामुख्याने लांबट मणी असलेल्या द्राक्षांची गरज असते, मात्र परदेशी बाजारपेठेसाठी थोडी आंबट-गोड चवीची, हिरव्या रंगाची गोल मण्यांची असावी लागतात. या मण्याचे आकारमान १६ ते २० मिलिमीटर आणि एका घडाचे किमान वजन २५० ग्रॅम असणे आवश्यक असते. आणि औषधाची मात्रा निर्धारित प्रमाणात असणे बंधनकारक असते. देशी बाजारासाठी मण्यातील साखरेचे प्रमाण २२ ब्रिक्सपर्यंत असते, तर निर्यातीच्या द्राक्षातील साखरेचे प्रमाण १८ ते २० पर्यंत असते.

गेल्या वर्षीपर्यंत निर्यातीच्या द्राक्षासाठी प्रतिकिलो १७ रुपये अबकारी कराची आकारणी केली जात होती. मात्र, यंदा यामध्ये तब्बल ५३ रुपये वाढ करण्यात आली असून, प्रतिकिलो ७० रुपये अबकारी कर भरावा लागणार असल्याने निर्यातीच्या द्राक्षांना मिळणारा दर उत्पादकांना परवडणारा नाही.

या कराबाबत विधी मंडळामध्ये विधानसभेचे विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे-पाटील, अमित देशमुख, विजय वडेट्टीवार, नसीम खान, अमिन पटेल, त्र्यंबक भिसे, वर्षां गायकवाड, अमर काळे, सुनील केदार, अस्लम शेख, हर्षवर्धन सपकाळ, डॉ. संतोष आरफे, अब्दुल सत्तार, संग्राम थोपटे, राहुल बोंद्रे, भारत भालके, अ‍ॅड. यशोमती ठाकूर आदींनी लक्षवेधी मांडली आहे. आमदारांच्या लक्षवेधीवर शासनाने सांगली बाजार समितीकडे या बाबतची माहिती मागविली आहे. यावर राज्य शासन काय निर्णय घेते याकडे द्राक्ष उत्पादकांचे लक्ष लागले आहे.