प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून रात्रीच्या वेळी तपासणी नाही

बोईसर : तारापूर औद्योगिक क्षेत्रातील एका कारखान्यात साठा करून ठेवलेल्या रासायनिक घनकचऱ्याची रात्रीच्या वेळेत बेकायदा वाहतूक केली जात असून त्याला बोईसर पोलिसांनी हिरवा कंदील दिल्याचे दिसून येत आहे. घनकचऱ्याची वाहतूक करणाऱ्या वाहनाची महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने तपासणी करणे गरजेचे असताना वादग्रस्त ठरलेले वाहन सोडण्यासाठी झालेल्या घाईमुळे अनेक सवाल उपस्थित होत आहेत.

तारापूर औद्योगिक क्षेत्रातील कारखान्यात साठवणूक करून ठेवलेला रासायनिक घनकचरा २० मे रोजी बाहेर काढण्यात आला आणि दोन वाहनांतून त्याची बेकायदा वाहतूक करण्यात आली. बोईसर पोलिसांकडे याबाबत तक्रार नोंदविल्यानंतर सुरुवातीला घातक घनकचरा घेऊन जाणाऱ्या वाहनाकडे दुर्लक्ष केले. मात्र पोलीस नियंत्रण कक्षाकडे याबाबत तक्रार केल्यानंतर शहराबाहेरील बेटेगाव चौकीवर वाहन चौकशीसाठी रोखण्यात आले. चौकशीसाठी थांबवलेली मालवाहू वाहने बोईसर पोलीस ठाण्याकडे नेत असताना अर्ध्या वाटेवरून मालवाहू वाहने पुन्हा बेटेगाव चौकीवर नेऊन त्यानंतर रात्री उशिरा वाहने सोडून देण्यात आली.

औद्योगिक क्षेत्रातील बंद असलेल्या या कारखान्यात मोठय़ा प्रमाणात रासायनिक घनकचरा साठवून ठेवला असल्याची माहिती पुढे आली आहे. कारखानदाराने आपल्या मालकीच्या दुसऱ्या एका कारखान्याची कागदपत्रे दाखवून गैरपद्धतीने या कारखान्यातील रासायनिक घनकचरा मुंबई वेस्ट मॅनेजमेंटच्या वाहनातून बाहेर काढला. महत्त्वाचे म्हणजे ज्या वेळी पोलिसांनी वाहन पकडले, त्या वेळी वेगळ्या कारखान्याचा उल्लेख असलेली कागदपत्रे उपलब्ध होती. मात्र वाहनांमध्ये भरलेला घनकचरा ज्या कारखान्याचा आहे, त्याची कागदपत्रे नसल्याच्या बाबीकडे पोलिसांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप होत आहे.

या कारखान्यातून वाहतूक करण्यात आलेल्या रासायनिक घनकचऱ्याबाबत तातडीने अहवाल सादर करण्याचे आदेश तारापूरच्या उपप्रादेशिक अधिकाऱ्यांनी दिले असून या प्रकरणात दोषी आढळल्यास कारवाई केली जाईल.

– राजेंद्र राजपूत, प्रादेशिक अधिकारी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, ठाणे</strong>