संदीप आचार्य

राज्यात मंदिरे व अन्य धार्मिक स्थळे लवकरात लवकर पुन्हा उघडण्याच्या दृष्टीने मार्गदर्शकतत्वे तयार करण्यात आली आहेत. राज्य कृती दलाने ही मार्गदर्शकतत्वे तयार केली असून सरकारला सादर केल्याचे आरोग्य विभागाच्या एका ज्येष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. त्यामुळे दिवाळीनंतर राज्यातील धार्मिक स्थळे पुन्हा एकदा भाविकांसाठी सुरु होतील असे चित्र आहे.

महाराष्ट्राला करोनाचा सर्वाधिक फटका बसल्यामुळे लॉकडाऊन मागे घेण्यापासून विविध उद्योग- व्यवसाय सुरु करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कमालीचा सावधगिरी बाळगताना दिसत आहेत. सरकारमधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उद्योगधंदे सुरु करण्याबाबत कमालीचा आग्रही असतानाही मुख्यमंत्री ठाकरे यांनी टप्प्याटप्प्याने उद्योग सुरु करण्यास परवानगी दिली. कोणताही उद्योग-व्यवसाय सुरु करण्यास परवानगी देण्यापूर्वी त्याबाबतची मार्गदर्शकतत्वे तयार करून मगच परवानगी देण्याचे धोरण मुख्यमंत्र्यांनी राबविल्याचा मोठा फायदा करोना नियंत्रित करण्यासाठी झाल्याचे वरिष्ठ अधिकार् यांचे म्हणणे आहे. हॉटेल-रेस्तराँ सुरु करताना तसेच जिम सुरु करण्यापर्यंत प्रत्येक वेळी करोना पसरणार नाही याची योग्य खबरदारी घेणारी व्यवस्था तयार केली गेली. यातूनच आज एकीकडे महाराष्ट्रात दिवसाकाठी साडेपाच हजार नवे रुग्ण आढळत आहेत तर दुसरीकडे बरे होणाऱ्यांची संख्या साडेसात हजाराच्या आगेमागे आहे. जवळपास ९० टक्के करोना रुग्ण बरे झाले असून राज्यात करोनाची दुसरी लाट आल्यास त्याचा सामना करण्याची पूर्ण तयारी असल्याचे आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी मंत्रिमंडळासमोर केलेल्या सादरीकरणाच्या वेळी सांगितले.

दरम्यान, रेस्तराँ-हॉटेल सुरु करताच विरोधी पक्ष असलेल्या भाजपाने मंदिरे उघडण्याची मागणी करत आंदोलन केली. घंटा बडविण्यापासून मंदिराचे राजकारण केले मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपाच्या मंदिर राजकारणाला न जुमानता सावधपणे याबाबत निर्णय घेतला जाईल अशी भूमिका मांडली. याच दरम्यान युरोपातील अनेक देशांनी लॉकडाऊन मागे घेताना योग्य काळजी न घेतल्याचा मोठा फटका बेल्जियम, नॉर्वे, इटालीपासून युरोपमधील अनेक देशांना बसताच त्यातील काही देशांनी पुन्हा संपूर्ण निर्बंध जारी केले तर काहींनी शाळा व धार्मिक स्थळे पुन्हा बंद करण्याबरोबर अनेक कठोर पावले उचलली. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात धार्मिक स्थळे पुन्हा उघडण्यासाठीची आचारसंहिता वा मार्गदर्शकतत्वे निश्चित करण्यास ‘राज्य कृती दला’ला सांगण्यात आले.

धार्मिकस्थळांबाबत मार्गदर्शक तत्वे

त्यानुसार राज्य कृती दलाने मंदिरे व अन्य धार्मिक स्थळे सुरु करण्याबाबत मार्गदर्शकतत्वे तयार केली आहेत. यात मंदिराचे दरवाजे सकाळी लवकर उघडावे आणि उशीरा बंद करावे. मंदिर बंद असण्याची वेळ किमान असावी. आजुबाजूचा परिसर सतत स्वच्छ व प्रकाशमान असावा, दर्शनासाठी ठराविक वेळ निश्चित करून तसे टप्पे ठरविण्यात यावेत. थेट गाभाऱ्यातील दर्शन कमीत कमी व्हावे यासाठी बंधने आणताना आडव्या पट्ट्यांचा वापर करावा. धार्मिक स्थळ परिसरात ५०० पेक्षा जास्त लोक एकावेळी उपस्थित नसावी तसेच सामाजिक सुरक्षित अंतराचे पालन व्हावे, धार्मिकस्थळी येणाऱ्या प्रत्येकाच्या शरीराच्या तापमानाची व ऑक्सिजनची तपासणी व्हावी, पुरेशा सॅनिटाइजरची व्यवस्था तसेच चोवीस तास स्वच्छतेची काळजी घेतली जावी. मंदिर वा धार्मिक स्थळी येणाऱ्यांना मास्कचा वापर बंधनकारक तसेच या सर्वांची योग्य प्रकारे अमंलबजावणी व्हावी यासाठी पुरेसा पोलीस व पालिका कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त ठेवावा अशी मार्गदर्शकतत्वे राज्य कृती दलाने सुचवली असून मुख्य सचिवांच्या पातळीवर यावर सखोल चर्चा होऊन त्याला अंतिम स्वरुप दिले जाणार आहे.

युरोपात पुन्हा धार्मिक स्थळं बंद करण्याची वेळ

यानंतर धार्मिक स्थळे सुरु करण्याचा निर्णय होऊ शकतो असे एका ज्येष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. युरोपातील अनेक देशांनी करोनाची दुसरी लाट आल्यामुळे त्यांच्याकडील धार्मिक स्थळे पुन्हा बेमुदत काळासाठी बंद केली आहेत. तशी परिस्थिती आपल्याकडे होऊ नये ही मुख्यमंत्र्यांची इच्छा असल्याने मंदिरे सुरु करण्याबाबत सावधानता बाळगण्यात येत असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. राज्य सरकारने घेतलेली खबरदारी लक्षात घेता दुसरी लाट आपल्याकडे येण्याची शक्यता कमी आहे. मात्र, अशी लाट आल्यास त्याचा मुकाबला करण्यासाठी आपण सज्ज आहोत असेही आरोग्यमंत्री म्हणाले. मंदिरे उघडण्याचा निर्णय हा दिवाळीनंतरच घेतला जाणार असून पूर्ण भाविकांच्या आरोग्याला सर्वोच्च प्राधान्य देऊनच मंदिरे सुरु केली जातील.