जळगाव पालिका घरकुल घोटाळा प्रकरणातील संशयित आ. गुलाब देवकर यांच्या न्यायालयीन कोठडीत १७ जानेवारीपर्यंत वाढ करण्यात आली आहे. दुसरे संशयित आ. सुरेश जैन यांची व्हिडिओच्या माध्यमातून चर्चेव्दारे न्यायालयीन कामकाजात भाग घेऊ देण्याची विनंती धुळे विशेष न्यायालयाने फेटाळून लावली. वारंवार प्रकृती अस्वस्थतेचे कारण देत न्यायालयीन कामकाजात सहभाग न घेणाऱ्या जैन यांच्यावर जिल्हा सत्र न्यायाधीश आर. आर. कदम यांनी ताशेरे ओढले.
घरकुल घोटाळ्याचे कामकाज सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार धुळे विशेष न्यायालयात स्थलांतरीत करण्यात आले आहे. धुळ्यातील विशेष न्यायालयात या प्रकरणातील पहिली सुनावणी गुरूवारी सुरू झाली. दोन दिवसांपूर्वी जळगावहून धुळे कारागृहात हलविण्यात आलेले राष्ट्रवादीचे नेते आ. देवकर यांच्यासह एकूण सहा आरोपींना न्यायालयासमोर उपस्थित करण्यात आले. तत्पूर्वी जळगाव कारागृहात असलेले प्रदीप रायसोनी, राजा मयूर, जगन्नाथ वाणी आणि शिवचरण ढंढोरे या संशयितांनाही पोलीस बंदोबस्तात जळगावहून धुळ्यात हलविण्यात आले. न्यायालयीन कामकाजावेळी त्यांच्यासह प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी आ. जैन यांची प्रकृती बरी नसल्याने जळगाव जिल्हा रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे त्यांना न्यायालयीन कामकाजात सहभाग घेता येत नसल्याचे जैन यांच्या वकिलांनी सांगितले.
न्यायालयात सदर आरोपींनी दाखल केलेल्या विविध अर्जावर कामकाज झाले. त्यात प्रामुख्याने जगन्नाथ वाणी यांना त्यांच्या नातवासह तीन विवाह सोहळ्यांमध्ये सहभागी होण्यासाठी सशर्त परवानगी देण्यात आली. दुसरा अर्ज जैन यांच्यातर्फे दाखल करण्यात आला होता.
न्या. कदम यांनी जैन यांचा प्रकृती अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. तिसरा अर्ज देवकर यांच्यातर्फे दाखल झाला होता. देवकरांना घरचे जेवण आणि औषधांची व्यवस्था करण्यात यावी, अशी मागणी करणाऱ्या अर्जावर न्यायालयाने सहा जानेवारीला सुनावणी करण्यात येईल, असे स्पष्ट केले. या प्रकरणाची पुढील सुनावणी १७ जानेवारीला होणार आहे. विशेष सरकारी वकील अ‍ॅड. एन. डी. सूर्यवंशी यांनी सरकारची बाजू मांडली.