ज्या प्रमाणे कंस राक्षसाचा अंत झाला तशीच रावसाहेब दानवे या मग्रुर नेत्याची अवस्था होईल अशी प्रतिक्रिया हर्षवर्धन जाधव यांनी दिली आहे. कंसालाही लाजवेल इतका अहंकार रावसाहेब दानवेंना आहे असंही त्यांनी म्हटलं आहे. केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी शेतकऱ्यांबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याविरोधात प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनीही आक्रमक पवित्रा घेतला. तर रावसाहेब दानवे यांचे जावई हर्षवर्धन जाधव यांनी कडाडून टीका केली आहे. अशा लोकांचा अंत निश्चितच वाईट आहे असंही जाधव यांनी म्हटलं आहे.

रावसाहेब दानवे यांचा तोल ढळला आहे. गेल्या वेळीही त्यांनी शेतकऱ्यांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. आता पुन्हा एकदा शेतकऱ्यांबद्दल बोलताना त्यांचा तोल ढासळला आहे. ज्यांच्यामुळे अन्न मिळतं अशा शेतकऱ्यांना रावसाहेब दानवे यांनी चीन आणि पाकिस्तानचे हस्तक म्हटलं आहे. ही मग्रुरी आहे, जनता ही मग्रुरी उतरवल्याशिवाय राहणार नाही असं हर्षवर्धन जाधव यांनी म्हटलं आहे. औरंगाबादमध्ये ते पत्रकारांशी बोलत होते.

काय म्हणाले होते दानवे?

शेतकरी आंदोलनामागे देशाबाहेरील षडयंत्र असून चीन आणि पाकिस्तानचा हात असल्याचा दावा त्यांनी केला आहे. हे शेतकऱ्यांचं आंदोलन नाही असंही ते म्हणाले आहेत. ते म्हणाले की, हे आंदोलन चालू आहे मात्र हे शेतकऱ्यांचं आंदोलन नाही. या आंदोलनाच्या पाठीमागे चीन आणि पाकिस्तानचा हात आहे. या देशामध्ये पहिल्यांदा मुस्लीम समाजाला उचकवलं आणि सांगितलं सीएए आणि एनआरसीमुळे मुस्लिमांना देशातून बाहेर जावं लागेल. एकाला तरी बाहेर जावं लागलं का? असाही प्रश्न त्यांनी विचारला.

दरम्यान रावसाहेब दानवे यांच्या याच वक्तव्यावर हर्षवर्धन जाथव यांनी कडाडून टीका केली आहे. रावसाहेब दानवे यांच्यात प्रचंड अहंकार आहे. कंसाला लाज वाटेल इतका अहंकार त्यांच्यात आहे. त्या अहंकारातूनच ते ही वक्तव्यं करत असतात. त्यांना जनता धडा शिकवेल असंही जाधव यांनी म्हटलं आहे.